औरंगाबाद : नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शहरात १० किमी अंतराचे स्वतंत्र फुटपाथ आणि सायकल ट्रॅक तयार करण्यात येईल, अशी घोषणा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी केली.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त महापालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे सायकल्स फॉर चेंज या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या हस्ते स. ६ वा. हॉटेल लेमन ट्री येथे हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरूवात झाली.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. गुप्ता म्हणाले की, आपण आपल्या मुला-मुलींना मोटरसायकल लवकर घेऊन देऊ नका. त्यांना जास्तीतजास्त सायकल चालवू द्या.
महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले की, सायकल चालविण्यासाठी चांगले रस्ते आवश्यक आहेत. त्याकरिता शहरात १०० कोटींचे रस्ते पूर्ण झाले आहेत. १५० कोटींचे रस्ते मान्यतेकडे आहेत आणि ते लवकरच पूर्ण होतील. सायकल चालविण्यासाठी आणि फुटपाथवर चालण्यासाठी एक स्वतंत्र मार्ग आपण लवकरच सुरू करणार आहेत. यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा झाली असून त्यांनी याबाबत सहमती दिली आहे. लवकरच सायकलसाठी व फुटपाथवर चालण्यासाठी कमीतकमी १० किमीचा मार्ग निश्चित करण्यात येईल आणि डिसेंबर अखेरीस तो पूर्ण होईल, असेही त्यांनी नमूद केले.