औरंगाबाद: घरबांधणीसाठी जमा केलेले साडेतीन लाख रुपये आणि सोन्याचे नेकलेस ,मोरणी असा सुमारे ३ लाख ८३ हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याची घटना २६ डिसेंबर रोजी मुकुंदवाडी परिसरातील मुकुंदनगर येथे उघडकीस आली. याविषयी मुकुंदवाडी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
बबन उर्फ गबऱ्या भागाजी मकळे (३५,रा. मुकुंदनगर)असे संशयिताचे नाव आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मारूती शंकर डोंगरे (३१)हे मुकुंदनगर येथे पत्र्याच्या शेडमध्ये पत्नी आणि दोन मुलासह राहतात. त्यांना घराचे बांधकाम करायचे असल्याने त्यांनी सासुरवाडीचे लोक, आई आणि अन्य नातेवाईक, मित्रांकडून पैसे जमा केले होते. त्यांना नुकतेच बी.सी.चे दिड लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम आणि आईने दिलेले सोन्याचे नेकलेस , सोन्याची मोरणी त्यांनी घरातील कपाटात ठेवली. नातेवाईकाच्या घरी आयोजित कार्यक्रमासाठी डोंगरे कुटुंब २२ डिसेंबर रोजी सायंकाळी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.
२६ रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ते घरी परतले तेव्हा त्यांना घराचा कुलूप तुटलेली दिसली. त्यांनी घरात डोकावून पाहिले असता कपाट उचकटलेले दिसले. या घटनेची माहिती त्यांनी लगेच मुकुंदवाडी पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक यु.जी.जाधव,डी.बी.पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल बांगर, कर्मचारी प्रकाश सोनवणे आणि अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तेव्हा चोरट्यांनी कपाटातील साडेतीन लाखाची रोकड, एक तोळ्याचे सोन्याचे नेकलेस आणि तीन हजाराची सोन्याची मोरणी असा सुमारे ३ लाख ८३ हजाराचा ऐवज लंपास केल्याचे समजले.