जीएसटी बोगस नोंदणीचे दिल्लीपर्यंत धागेदोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:02 AM2021-01-17T04:02:16+5:302021-01-17T04:02:16+5:30
औरंगाबाद : शहरातील सात व्यापाऱ्यांनी बोगस जीएसटी नोंदणी क्रमांक मिळविला. त्यांनी प्रत्यक्षात कोणत्याही मालाची खरेदी- विक्री न करता ...
औरंगाबाद : शहरातील सात व्यापाऱ्यांनी बोगस जीएसटी नोंदणी क्रमांक मिळविला. त्यांनी प्रत्यक्षात कोणत्याही मालाची खरेदी- विक्री न करता खोटी बिले सादर करीत करचुकवेगिरी केली व शासनाला चुना लावला. या बोगस व्यवहाराचे गुजरात, दिल्लीपर्यंत धागे जोडल्याचे राज्य जीएसटी विभागाने केलेल्या तपासात आढळून आले आहे.
सात बोगस व्यापाऱ्यांचा राज्य जीएसटीच्या औरंगाबाद विभागाने शुक्रवारी पर्दाफाश केला. खोट्या कागदपत्रांचा वापर करून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा २०१७ अन्वये नोंदणी करून या बोगस व्यापाऱ्यांनी जीएसटीआयएन क्रमांक प्राप्त केला. खरेदी-विक्री न करता खोटी बिले तयार केली. खरेदीवर इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवले. विवरणपत्र भरताना बोगस बिले दाखवून करचुकवेगिरी केली. राज्य जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या बोगस व्यवहारांची ऑनलाइन तपासणी करत असताना महाराष्ट्रात २५ व राज्याबाहेर कर्नाटक, गुजरात, दिल्लीपर्यंत २००पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी अशाच प्रकारच्या मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी तसेच खोटी कागदपत्रे वापरून नोंदणी दाखले घेतल्याचे समोर आले.
या बोगसगिरीची व्याप्ती मोठी असल्याने व याद्वारे मोठ्या प्रमाणात करचुकवेगिरी करून सरकारच्या महसुलास हानी पोहोचविल्याचे सिद्ध झाल्याने आता राज्य जीएसटीच्या औरंगाबाद विभाग कार्यालयाने कर्नाटक, गुजरात, दिल्लीपर्यंतच्या प्रत्येक जिल्ह्यातील जीएसटी कार्यालयांना ई-मेलद्वारे माहिती दिली आहे. खोटी कागदपत्रे सादर करून जीएसटीएन नंबर मिळविणाऱ्या बोगस व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राज्य जीएसटी विभागतील सूत्रांनी दिली.