लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यात २८८ आमदारांपैकी मी एक आहे. खुर्चीचा मोह अनेकांना सुटत नाही. राज्यकर्ते जेव्हा खुर्चीला चिकटून बसणे बंद करतील त्या दिवसापासून जनतेचे अनेक प्रश्न सुटलेले असतील. निर्णय घेण्याची धमक असावी लागते. पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये माझा समावेश आहे. महिलांचे आरोग्य, महिलांचा स्वाभिमान आणि महिला सक्षमीकरणाबद्दल आग्रही भूमिका घेण्याची धमक दाखवली नसती, तर माझे मंत्रिपद काय कामाचे असते, अशी भूमिका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे व्यक्त केले.विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला बचत गटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री या विभागीय सरस महोत्सव ‘सिद्धा २०१७-१८’चे उद्घाटन रविवारी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर आ. प्रशांत बंब, जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, उपायुक्त पारस बोथरा, सूर्यकांत हजारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे, जि.प. उपाध्यक्ष केशव तायडे, बांधकाम सभापती विलास भुमरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी केले.जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपामध्ये १८० स्टॉल्स उभारण्यात आले असून, मराठवाड्यातील जवळपास २०० बचत गट या महोत्सवात सहभागी झाले आहेत. महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी पंकजा मुंडे यांनी महोत्सवातील विविध स्टॉल्सना भेट देऊन बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची पाहणी केली.याप्रसंगी पंकजा मुंडे म्हणाल्या की, नीर आणि नारी जिथे सुरक्षित असते तो समाज पुढारलेला असतो. त्यामुळे महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी आम्ही भूमिका घेतली. जलयुक्त शिवार योजनेद्वारे मराठवाड्यातील दुष्काळ हटविण्याचा प्रयत्न केला. जर ७० वर्षांपूर्वी हे काम झाले असते, तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, माझी अस्मिता, जलयुक्त शिवार, स्वच्छता मोहीम, अशा जनतेच्या मनातील अनेक योजना भाजप सरकारच्या काळात सुरू झाल्या. घरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी पंतप्रधानांना आवाहन करावे लागले. आता मराठवाडा बेसलाईनच्या सर्वेक्षणात हगणदारीमुक्तीच्या मार्गावर आहे. उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी आभार मानले.कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य असलेल्या बचत गट, पत्रकार व बँक अधिकाऱ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.बचत गटांना देणार १ मेपासून सॅनिटरी नॅपकीनपंकजा मुंडे म्हणाल्या की, माझी अस्मिता योजनेंतर्गत अलीकडच्या पंधरा दिवसांत १० हजार बचत गटांनी नोंदणी केली आहे. १ मेपासून बचत गटांना सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार आहेत. बचत गटांना सक्षम करण्यासाठी शून्य टक्का व्याज आकारून कर्ज देण्यात येत येणार आहे. बचत करणे ही महिलेची ताकत आहे. महिला कोणाच्याही ऋणात राहू इच्छित नाहीत. त्यांच्यात स्वाभिमान टिकून राहावा यासाठी महिलांच्या नावे १ लाख ५० हजार ९३४ घरकुले करण्यात आली आहेत. राज्यात आता प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बचत गटांना कापडी पिशव्या तयार करण्याचे काम देण्यासंबंधी विचार केला जात आहे.
निर्णय घेण्याची धमक लागते- पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:13 AM
राज्यात २८८ आमदारांपैकी मी एक आहे. खुर्चीचा मोह अनेकांना सुटत नाही. राज्यकर्ते जेव्हा खुर्चीला चिकटून बसणे बंद करतील त्या दिवसापासून जनतेचे अनेक प्रश्न सुटलेले असतील. निर्णय घेण्याची धमक असावी लागते. पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये माझा समावेश आहे. महिलांचे आरोग्य, महिलांचा स्वाभिमान आणि महिला सक्षमीकरणाबद्दल आग्रही भूमिका घेण्याची धमक दाखवली नसती, तर माझे मंत्रिपद काय कामाचे असते, अशी भूमिका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे व्यक्त केले.
ठळक मुद्देबचत गट महोत्सव : ‘अस्मिता’ योजनेंतर्गत सॅनेटरी नॅपकीन वाटप शुभारंभ