मृगाच्या पावसाने दडी मारल्याने जिरायती कापूस पेरण्यांवर अधिक भर
सोयगाव : जूनचा निम्मा महिना संपला तरीही मृगाचा थेंबही सोयगाव तालुक्यात बरसला नसल्याने सोयगाव तालुक्याचा यंदाचा खरिपाचा हंगाम धोक्यात आलेला असल्याचे चित्र आहे.
तालुक्यात खरिपाच्या हंगामात जिरायती कापूस आणि भाजीपाला, मिरची आणि अद्रक या पिकांची ४९४८ हेक्टरवर तीन टक्के पेरण्या झालेल्या आहेत. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांमधील प्रमुख पिके म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन, ज्वारी, उडीद, बाजरी, मका आदी पिकांच्या खरिपाच्या पेरण्या पावसाच्या दीर्घ दडीमुळे रखडल्या आहेत. मृगाचे नक्षत्र निम्मे हातातून निसटले आहे. त्यातच उन्हाची काहीली सुरू झाली आहे, अचानक तापमानात वाढ झाली असून परिसरात कडाक्याचे ऊन तापत आहे.
जूनचा निम्मा महिना उलटला तरीही खरिपाच्या पेरण्यांना पावसाअभावी सुरुवात झालेली नाही. त्यामुळे सोयगाव तालुक्यात बागायती आणि कोरडवाहू कापूस पिकांच्या लागवडीची धांदल उडाली आहे. खरिपाच्या हंगामात मृगाचा निम्मे नक्षत्र कोरडेठाक गेले. मृगाच्या नक्षत्राचा आठवडाच हातात शिल्लक आहे; परंतु अद्यापही पावसाचे संकेत प्राप्त होत नाहीत. त्यामुळे पावसाअभावी सोयगाव तालुक्यात खरिपाच्या हंगामावर संक्रात पडली आहे.
कृषी विभागाच्या अहवालावरून ४९४८ हेक्टरवर कपाशीसह इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे तीन टक्के पेरण्या तालुक्यात झाल्याचे चित्र आहे. यात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी या प्रमुख खरिपाच्या पिकांच्या पेरण्या केलेल्या नाही. त्यामुळे पावसाचा अंदाज नसल्याने शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात मिरची आणि अद्रक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. तालुक्यात १०२ हेक्टरवर मिरची पिकांची लवाद करण्यात आलेली असून बागायती कापूस पिकांची लागवड चार हजार सहाशे वीस हेक्टरवर तर कोरडवाहू कापूस पिकांची लागवड केवळ ११६ हेक्टरवर झालेली आहे. तालुक्यात एकूण ४९४८ हेक्टरवर खरिपाच्या तीन टक्के पेरण्या झालेल्या आहेत. तर तब्बल ३९,७८९ हेक्टर क्षेत्र अद्यापही खरिपाच्या पेरण्याअभावी रिकामे आहे.
----
छायाचित्र ओळ - कवली परिसरात खरिपाच्या पेरण्यांसाठी मशागतीचे काम करताना शेतकरी.
150621\ynsakal75-0648324832_1.jpg
सोयगाव शिवारात पावासामळे पेरण्या रखडल्या आहेत.