संशयास्पद ट्रकसह तीन लाखांचा हरभरा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2016 11:57 PM2016-02-21T23:57:26+5:302016-02-21T23:59:47+5:30
गंगाखेड : ट्रकसह ३ लाख रुपये किंमतीचा हरभरा पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या वेळी पकडला़ यामध्ये तीन संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़
गंगाखेड : शहरातील दत्तमंदिर परिसरात राणीसावरगाव रोडवर संशयास्पद ट्रकसह ३ लाख रुपये किंमतीचा हरभरा पोलिसांनी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या वेळी पकडला़ यामध्ये तीन संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़
गंगाखेड येथील बीट अंमलदार बाळू पुरणवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी दत्तमंदिर परिसरात राणीसावरगाव रोडवर हरभरा भरलेला एक ट्रक उभा असल्याचे समजले़ या ट्रकमधील तीन व्यक्ती हरभरा कमी किंमतीत परिसरामध्ये विकत असल्याची माहिती मिळाल्यावरून डीबी पथकातील किशोर भुमकर, मारोती सुरेवाड, सुग्रीव कांदे यांनी सदर ठिकाणी जाऊन ट्रक व त्यामधील १४० पोते हरभऱ्या संबंधी तिघांकडे चौकशी केली़ चौकशीत तिघांनी ट्रक व हरभरा आमचाच असल्याचे सांगून तो विकण्यासाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले़ मात्र अधिक तपासात वरील तिघेही ट्रकची कागदपत्रे सादर करू न शकल्याने व संशयास्पद उत्तरे देण्यात येत असल्याने ट्रकमधील (एमएच २४ ए-२६६१) १४० पोते हरभरा ज्याची किंमत अंदाजे २ लाख ८० हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला़
या प्रकरणी गंगाखेड पोलिसांनी रमेश राठोड (वय ३५, रा़ शिवाजीनगर तांडा, जि़ नांदेड) , अनिल चव्हाण व काशीराम चव्हाण (दोघे रा़ वरवंटी, ता़ गंगाखेड) यांच्याविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल केला़ बाळू पुरणवाड, विष्णू बेले हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत़ (प्रतिनिधी)