वाळूज महानगर : आठवडाभरापूर्वी कांचनवाडी परिसरातून गस्तीवरील पोलिसांनी पाठलाग केल्यामुळे घाबरलेल्या चोरट्यांनी वाळूजला कार सोडून पलायन केले होते. या चोरट्यांना शोध लावण्यात वाळूज पोलिसांना यश आले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोघांचा शोध पोलीस घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलीस आयुक्तालयातील पीसीआर-८ या व्हॅनचे कर्मचारी गत शुक्रवारी रात्री कांचनवाडी शिवारात गस्तीवर होते. या गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना मध्यरात्रीनंतर २.३० वाजेच्या सुमारास लालरंगाची कार भरधाव जात असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पोलिसांनी कार चालकाला थांबविण्याचा इशारा केला. मात्र, तो न थांबता वेगाने निघून गेला. त्यामुळे पोलिसांनी कारचा पाठलाग केला. दरम्यान, वायरलेसद्वारे कारची माहिती वाळूज पोलिसांना दिली होती. त्याचवेळी पोलीस निरीक्षक सतीश टाक, पोहेकॉ.शेख सलीम व त्यांचे सहकारी नगररोडवर गस्तीवर होते. त्यांनी संशयित कार पकडण्यासाठी नाकाबंदी केली होती. शहराकडून नगरकडे भरधाव जाताना पोलिसांच्या भितीने चालकाने कार वाळूजच्या लायननगरात घुसविली होती. मात्र पुढे जाण्यासाठी रस्ता नसल्याने कार लॉक करुन चालकासह कारमधील इतर संशयित चोरटे अंधारात पसार झाले होते. कारमधून (एम.एच.०२, बी.वाय.१२६३) दोन तलवारी, एक कोयता, एक कटर मशिन, लोखंडी रॉक, एक हेल्मेट आदी साहित्य हस्तगत केले होते. ही कारवाई उपनिरीक्षक अमित बागुल, पोकॉ.प्रदीप बोरुडे, पोकॉ. ज्ञानेश्वर माने, पोकॉ. राजू डाखोरे, पोकॉ.सुरेश कच्छवे यांनी केली.
असे पकडले चोरटेसंबंधित कार अमोल काशीनाथ खरात (रा.साठेनगर, वाळूज) याची असल्याची माहिती खबºयाने उपनिरीक्षक अमित बागुल यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी त्याला घरातून अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच चार साथीदारांसह सातारा परिसरात चोरीच्या उद्देशाने गेल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी शुक्रवारी सकाळी गोकुळ दिलीप आराक (रा.बकवालनगर) व संतोष अशोक कांबळे (रा.वाळूज) याला अटक केली. तर या घटनेतील विकास केदारे (रा.रामराई) व अन्य एक चोरटा फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.