गोळीबार, अपहरण करणाऱ्या टोळीच्या शोधात तीन पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 01:25 PM2020-11-06T13:25:47+5:302020-11-06T13:33:08+5:30
हुसेन कॉलनीतील नदीम पठाण रऊफ पठाण यांच्यावर देवानगरी भागात बुधवारी गोळीबार करून चार ते पाच गुंडांनी त्यांचे कारमधून अपहरण केले.
औरंगाबाद : बांधकाम कंत्राटदार तरुणावर गोळी झाडून त्यांचे अपहरण करण्याच्या सनसनाटी घटनेस ४८ तास उलटले आहेत; परंतु अद्याप आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. आरोपींना पकडण्यासाठी गुन्हे शाखेची तीन पथके विविध ठिकाणी रवाना झाली आहेत.
हुसेन कॉलनीतील नदीम पठाण रऊफ पठाण यांच्यावर देवानगरी भागात बुधवारी गोळीबार करून चार ते पाच गुंडांनी त्यांचे कारमधून अपहरण केले. इंधन संपल्यामुळे कारसह नदीम यांना आपत भालगाव येथे रस्त्यात जखमी अवस्थेत सोडून आरोपी पसार झाले होते. नदीम यांचा भाऊ वसीम यांच्या तक्रारीवरुन बुधवारी रात्री उशिरा सातारा ठाण्यात आरोपी फिरोज, त्याची तीन मुले आणि अन्य तीन अनोळखींवर गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. ही घटना समोर आल्यापासून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, उपनिरीक्षक विठ्ठल चासकर आणि उपनिरीक्षक विजय पवार यांची तपास पथके रवाना झाली.
संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील देवानगरी परिसरातील घटनाhttps://t.co/6qG74dfpaT
— Lokmat Aurangabad (@milokmatabd) November 4, 2020
आरोपींची मागणी १० लाखांची
रस्त्यावरील बांधकाम साहित्यावरून सादातनगर, पटेल प्राईडमधील रहिवासी फिरोज याचे नदीम आणि त्याच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. काही लोकांनी मध्यस्थी केल्याने तडजोड झाली होती. मात्र, यानंतरही फिरोज गटाने नदीम आणि त्यांच्या कुटुंबावर दागिने आणि रोख रक्कम चोरल्याचा आरोप करीत १० लाख रुपयांची मागणी केली. यातून त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता. त्यानंतर आरोपींनी बुधवारी नदीमवर गोळी झाडून गंभीर जखमी केले आणि कारमधून पळवून नेले.