महानगरपालिकेच्या पाहणीत शहरात आढळली तीन हजारांवर अनधिकृत बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 03:42 PM2019-02-20T15:42:19+5:302019-02-20T15:46:31+5:30

संपूर्ण शहराचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर बेकायदा बांधकामांबाबत निर्णय घेणार.

Three thousand unauthorized constructions found in the city in the municipal survey | महानगरपालिकेच्या पाहणीत शहरात आढळली तीन हजारांवर अनधिकृत बांधकामे

महानगरपालिकेच्या पाहणीत शहरात आढळली तीन हजारांवर अनधिकृत बांधकामे

googlenewsNext
ठळक मुद्दे६७१ जणांना नोटिसा बजावली  बांधकामाबाबत सर्वेक्षणानंतर घेणार निर्णय

औरंगाबाद : शहर परिसरात अनधिकृत बांधकामे सर्रास सुरू असून, मनपाने केलेल्या पाहणीत तब्बल तीन हजारांवर अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. यामध्ये ६७१ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहराचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर बेकायदा बांधकामांबाबत  निर्णय घेण्यात येणार आहे. 

शहराचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विस्तार झाला आहे. परिसरात नव्याने गुंठेवारीच्या वसाहतींची भर पडत आहे. महपालिकेचा कानाडोळा होत असल्याने नारेगाव, चिकलठाणा, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनपलीकडील परिसर, मिटमिटा, पडेगाव, हर्सूल भागात २० बाय ३० आकाराच्या प्लॉटची सर्रास विक्री होत आहे. अवघ्या काही महिन्यांत या भागांमध्ये नागरिक पक्की बांधकामे करून राहण्यासाठी जातात. त्यानंतर या ठिकाणी पाणी, ड्रेनेज, पथदिवे, रस्ते अशा सोयी-सुविधांची मागणी केली जाते.

अनधिकृत वसाहतींमुळे महापालिकेवर भार वाढत आहे. राज्य शासनाने डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मनपाने आवाहनदेखील केले; परंतु त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. इमारत निरीक्षकांकडून हे सर्वेक्षण केले जात असून, आतापर्यंत ३५ टक्के  सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यात सुमारे तीन हजार ५०० बेकायदा बांधकामे आढळून आली आहेत. 

नियमित करणार?
महापालिकेच्या नोंदीनुसार २ लाख २० हजार मालमत्ता असल्या तरी प्रत्यक्षात ३ लाखांपेक्षा जास्त मालमत्ता असाव्यात, असा अंदाज नगरसेवकांकडून व्यक्त केला जातो. अनधिकृत बांधकामांची माहिती घेतल्यानंतर अशा मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिका प्रयत्न करील, असे सूत्रांनी सांगितले. 

 

Web Title: Three thousand unauthorized constructions found in the city in the municipal survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.