गंगापूर : तालुक्यातील अहमदनगर पुणे मार्गावरील अंतापूर शिवारात दरोडेखोर व पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. यावेळी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याने दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून एका दरोडेखोराला पकडले असून दोन दुचाकी आणि शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.
शुक्रवार मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला गंगापूर शहरात पोलिसांकडून मिडनाईट मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम संपल्यावर पोलीस कर्मचारी व अधिकारी कार्यक्रमाची चर्चा करत असतानाच पोलीस निरीक्षक सुरवसे यांना अंतापूर शिवारात दोन दुचाकीवरून पाच ते सहा जण दरोड्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. सुरवसे यांनी वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन चौधर, रामहरी चाटे, पोलीस कर्मचारी जितेंद्र बोरसे, विजय भिल, भागचंद कासदे ,बंडू कुचेकर, दत्तात्रय गुंजाळ, चालक शेख रिजवान यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. पोलिस आल्याची चाहूल लागताच दरोडेखोरांनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या दुचाकी घसरल्याने ते खाली पडले. यानंतर अंधाराचा फायदा घेत दरोडेखोरांनी तेथून पलायन केले.
पोलिसांनी पाठलाग करताच त्यांनी दगडफेक सुरु केली. यात पो.नि. सुरवसे जखमी झाले. हल्ला वाढत असल्याने सुरवसे यांनी सर्व्हिस पिस्टल मधून दोन राऊंड हवेत फायर केले. गोळीबार होताच दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करत यातील एकाला ताब्यात घेतले आहे. यावेळी दोन दुचाकी आणि काही शस्त्रेसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. दरम्यान, तीन दरोडेखोर हे अहमदनगर जिल्ह्यातील तर दोघे वाळूज परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. कारवाईत जखमी झालेले पो.नि.सुरवसे यांच्यावर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले.