औरंगाबाद : वेरूळ लेणी परिसरात आज सकाळी एका नागरिकास वाघ दिसला आणि त्याने त्याचा व्हिडिओ केला. काही वेळात हा व्हिडिओ व्हायरल झाला. आता व्हिडिओमध्ये वाघ आहे की बिबट्या याबाबत चर्चा सुरु झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये वाघ असल्याचे म्हटले आहे तर वन विभागाने या भागात केवळ बिबट्या असल्याचा दावा केला आहे. ( Forest department alert in Ellora-Khultabad area after leopard seen )
जागतिक पर्यटन वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी परिसरात आज सकाळी एका नागरिकास डोंगर कपारीत वाघ दिसून आला. त्याने लागलीच त्याचा एक व्हिडिओ तयार केला. यानंतर वाघ खुलताबाद गेस्ट हाउसच्या दिशेने गेला. बघताबघता हा व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे वेरूळ, खुलताबाद, सुलीभंजन आणि म्हैसमाळ या परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच वन विभाग सतर्क झाला आहे. वन विभागाची पथके या परिसरात पाहणी करत आहेत. दरम्यान, वन विभागाने या परिसरात मागील दोन वर्षांपासून बिबट्याचा वावर आहे. यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये वाघ नसून केवळ बिबट्या असू शकतो असा दावा केला आहे. तसेच पर्यटक आणि परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
मागील दोन वर्षांपासून वेरूळ, खुलताबाद सुलीभंजन आणि म्हैसमाळ परिसरात बिबट्याचा वावर आहे. व्हायरल व्हिडिओमुळे पर्यटक आणि परिसरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वन विभागाची पथके सतर्क असून परिसरात पाहणी करत आहेत. - अण्णासाहेब तेहरकर, वन परिक्षेत्र अधिकारी, खुलताबाद