सोयगाव (औरंगाबाद ) : तालुक्यातील तिखी गावात सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेतून क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा झाल्याने ग्रामस्थांना पोटाचे विकार जडले आहेत. मागील काही दिवसांपासून पोट दुखी आणि किडनी स्टोन अशा आजाराने ग्रामस्थ हैराण आहेत. दरम्यान, या बाबत माहिती मिळताच आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाण्याचे नमुने घेतले आहेत.
कवली ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या तिखी या गावात सार्वजनिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. मात्र, मागील चार महिन्यांपासून यातून क्षारयुक्त पाण्याचा पुरवठा झाला. यामुळे ग्रामस्थांना किडनी स्टोन तसेच पोटाच्या विकारांचा त्रास सुरु झाला. आज जवळपास २५ जणांना किडनी स्टोनचा त्रास जाणवल्याने पाचोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत क्षाराचे वाढत्या प्रमाणाचे अद्याप कारण स्पष्ट झाले नसून आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
निदान सुरु आहे पोटाच्या विकाराचे निदान व सर्वेक्षण करण्याच्या सुचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहे.- डॉ. श्रीनिवास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी सोयगाव
आरोग्य पथक तैनात केले आहे स्थिती चिंताजनक नाही. काही रुग्णांना पोटाच्या विकाराचा त्रास मोठ्या प्रमाणावर आहे. उपचारासाठी आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आले आहे.- प्रकाश दाभाडे, प्रभारी गटविकास अधिकारी