- संतोष हिरेमठऔरंगाबाद : कोणत्याही व्यक्तीच्या चेहऱ्यामध्ये ठळकपणे उठून दिसतात ते त्या व्यक्तीचे केस, डोळे, नाक आणि दात. मात्र केस, डोळे, नाक हे समोरच्या व्यक्तीला सहजपणे दिसून येतात म्हणून त्याकडे अधिक लक्ष दिले जाते. परंतु संपूर्ण शरीराचे आरोग्य अवलंबून असलेल्या दातांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अगदी दात काढण्याची वेळ येईपर्यंत दुखण्याकडे कानाडोळा केला जातो. त्रास वाढला की डाॅक्टरांकडे धाव घेतली जाते. पण असे करण्यापेक्षा रोज दातांची योग्य निगा राखल्यास कधी त्रासच जाणवणार नाही, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
वर्षांतून एकदा तपासणी आवश्यकमुलांची ६ महिन्यांतून एकदा आणि मोठ्यांनी वर्षांतून एकदा दातांची तपासणी करून घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले. काही बाबी निदर्शनास आल्या तर वेळीच उपचार करून मुख आरोग्य जपता येते.
...तर नकली दातांची गरजच नाहीजेव्हा खालच्या किंवा वरच्या जबड्याच्या, हिरडीच्या आतील हाडामध्ये टायटॅनियम धातूमध्ये बनविलेल्या छोट्या ‘स्क्रू’चे रोपण करून हिरडीबाहेरील टायटॅनियम ‘स्क्रू’च्या बाह्य भागावर सिरॅमिकचा दात (सुपरस्ट्रक्चर) बनविला जातो. अशा कृत्रिम दाताला इम्प्लांटचा दात, असे म्हणतात. पण काळजी घेतली तर असे कृत्रिम दात बसविण्याची गरजच नाही.
दातांची क्लिनिंगदेखील महत्त्वाचीदात घासण्याची पध्दतच चुकीची असेल तर अनेक वेळा दात घासूनही उपयोग नाही. दात दिवसातून किमान दोन वेळा डॉक्टरांनी सांगितलेल्या पध्दतीने घासावेत. प्रत्येक जेवणानंतर दात घासले तर अति उत्तम. मऊ ब्रश वापरावा.
वेळेत उपचार केल्यास वेळ वाचतो अन् ...वेळेत उपचार केल्यास दात काढून टाकण्याची वेळ टळू शकते. दाताला कीड लागण्याची वेळ येऊच देऊ नये. तक्रार उद्भवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. मनाने औषधी घेऊ नयेत.
हलक्या हाताने दात स्वच्छ करासाॅफ्ट ब्रशने ३ ते ४ मिनिटे हलक्या हाताने दात स्वच्छ करावेत. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. कडक पदार्थ खाणे टाळावे. तोंडाच्या दोन्ही बाजूने खाद्यपदार्थ खाल्ले पाहिजेत. हिरड्यांना बोटाने मसाज करावा. तसेच अन्नपदार्थ सेवन केल्यानंतर खळखळून चूळ भरावी.- डाॅ. अभिजित चपळगावकर, राज्य प्रतिनिधी, औरंगाबाद दंतचिकित्सा संघटना
...तर म्हातारपणातही दात मजबूतचिकट पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे. ११० वर्षीय ज्येष्ठांचेही दात चांगले राहिल्याची उदाहरणे आहेत. काळजी घेतली तर म्हातारपणातही दात मजबूत राहतात. तंबाखूमुळेही दात खराब होतात. व्यसनापासून दूर राहावे.- डाॅ. जगदीशचंद्र वठार, सामाजिक दंतशास्त्र विभागप्रमुख, शासकीय दंत महाविद्यालय