एकाच दिवसाची आज ‘उभारी’; मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांघरी जाणार अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 03:38 PM2018-04-04T15:38:11+5:302018-04-04T15:41:38+5:30
मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील कर्ता, कमविता सदस्य गेल्यानंतर निराधार होत असल्याची माहिती डिसेंबर २०१७ मध्ये समोर आली
औरंगाबाद : मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील कर्ता, कमविता सदस्य गेल्यानंतर निराधार होत असल्याची माहिती डिसेंबर २०१७ मध्ये समोर आली; परंतु ही माहिती मंडळ स्तरावर महसूल कर्मचाऱ्यांनी कागदोपत्रीच संकलित केल्याचे २६ मार्च रोजी समोर आल्यानंतर ४ एप्रिल या एकाच दिवशी पूर्ण मराठवाड्यातील ४६५ सर्कलमध्ये नव्याने ‘उभारी’ या कार्यक्रमांतर्गत पाहणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी जारी केले आहेत. त्यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी पत्र पाठविले आहे. सदरील पाहणी प्रभाव व संवेदनशील पद्धतीने करण्यात यावी, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.
उद्या पाहणीमध्ये महसूल कर्मचाऱ्यांसोबत एनजीओचे प्रतिनिधीदेखील सहभागी होणार आहेत. विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी मराठवाड्यातील ४६५ मंडळांतील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाठविले होते. त्याचा अहवाल ७ डिसेंबर २०१७ रोजी तयार झाल्यानंतर धक्कादायक वास्तव पुढे आले होते. ३,९५१ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दारी प्रशासन अधिकारी गेलेच नाहीत. कागदोपत्री एकाच दिवसाची आज ‘उभारी’ अहवाल सादर करून ते कर्मचारी मोकळे झाल्याचे २६ मार्चच्या महिला सक्षमीकरण परिषदेत समोर आले. त्यामुळे यावेळी पाहणी संवदेनशील करून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्तांनी आदेशित केले आहे. या आदेशाची अंमलबजाणी बुधवारपासून करण्यात येणार आहे.
पाहणीमध्ये या मुद्यांवर भर
- कुटुंबांनी मागणी केलेल्या योजनांचा लाभ मिळाला आहे काय?
- कुटुंबप्रमुख म्हणून सध्या कोण आहे.
- आत्महत्या करणाऱ्याची मालमत्ता वारसांच्या नावे आहे काय?
- कुटुंबाचा सामाजिक प्रवर्ग कोणता आहे.
- कुटुंबाचा कोणत्या स्वयंरोजगाराकडे कल आहे.
- मागणी केलेल्या योजनेचा लाभ ३० एप्रिलपर्यंत द्यावा.
- शेतकऱ्याच्या वारसांची नावे मालमत्तेवर ३० एप्रिलपर्यंत घ्यावीत.
- त्याचा अहवाल ५ मेपर्यंत कार्यालयास सादर करावा.
जिल्हा कुटुबांची संख्या
औरंगाबाद ४६५
जालना २७४
परभणी ४३३
हिंगोली १६९
नांदेड ६९३
बीड १०२५
लातूर ३४४
उस्मानाबाद ५४८
एकूण ३,९५१