अंत्ययात्रेला निघालेले ट्रॅक्टर पाण्यात कलंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:26 PM2020-09-25T17:26:07+5:302020-09-25T17:26:43+5:30
नादरपूरच्या अंजना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना स्मशानभूमीपर्यंत जाण्यास अनेक अडचणी येत आहेत. पाच ते दहा फुट पाणी असल्याने अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनातूनच स्मशानभूमीपर्यंत आणावे लागत आहे.
पिशोर : नादरपूर शिवारात २१ वर्षीय तरूणाने गुरूवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरूणाच्या अंत्ययात्रेसाठी निघालेल्या महिलांचे ट्रॅक्टर सायंकाळच्या सुमारास स्मशानभूमीजवळच कलंडल्याची घटना गुरूवारी घडली. या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
अंजना नदीवरील पूल विधानसभा निवडणूकीदरम्यान घाई गडबडीत तोडण्यात आला होता. तो अद्यापही दुरूस्त झाला नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नादरपूरच्या अंजना नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने नागरिकांना स्मशानभूमीपर्यंत जाण्यास अनेक अडचणी येत आहेत. पाच ते दहा फुट पाणी असल्याने अंत्ययात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनातूनच स्मशानभूमीपर्यंत आणावे लागत आहे.
सदरील ट्रॅक्टरही नदीत मधोमध आल्यानंतर त्याची चाके वाळूत रूतल्याने ट्राॅली अर्धी कलंडली. हे पाहताच पायी गेलेल्या नगारिकांनी ट्रॅक्टरकडे धाव घेत पाण्यात पडलेल्या महिलांना बाहेर काढले. हा नेहमीचाच झालेला प्रश्न लवकरच सोडवावा, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.