ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला ट्रक धडकल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:18 AM2018-12-25T00:18:04+5:302018-12-25T00:18:21+5:30
ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ट्रक धडकल्याने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाल्याने वाहनधारक व प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
दौलताबाद : ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ट्रक धडकल्याने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाल्याने वाहनधारक व प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
औरंगाबाद -खुलताबाद महामार्गावर कन्नडकडून औरंगाबादकडे जाणारा ट्रक क्र. एमएच -ईजी -५८५८ हा दौलताबाद घाट उतरत असताना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला धडकला. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी ट्रकचे नुकसान झाले. अपघातानंतर चालक फरार झाला. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत रांगाच रांगा लागल्या होत्या. सध्या सुट्या असल्यामुळे पर्यटकांची वाहने मोठ्या प्रमाणात येत आहेत. दोन तास वाहतूक ठप्प असल्यामुळे अनेक पर्यटकांना पर्यटन स्थळावर वेळेत पोहोचता आले नाही. अनेक पर्यटक पायी चालताना दिसले.
घटनास्थळी छावणी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक इलियास पठाण, श्रीकांत राठोड, आर.पी. जाधव, अब्दुल चाऊस, अनिल पवार, जी.एम. राठोड, मारुती गुंजाळ, दौलताबादचे पोलीस सचिन त्रिभुवन, अशोक शेळके, जमील शेख, सय्यद खलील, वसीम शेख, शेख जुनेद यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
क्रेनच्या साह्याने ट्रक बाजूला करण्यात आला. घाटाकडून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. दोन तासात शेकडो वाहनधारकांचे हाल झाले.
फोटो... दौलताबाद येथील ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला ट्रक धडकल्याने या महामार्गावर जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या अशा रांगा लागल्या होत्या.