गणेश दळवी ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : गद्दार शब्दालाही लाज वाटेल असा हा गद्दार माणूस तुमच्या आष्टीत जन्माला आला आहे. ज्याने स्व.गोपीनाथ मुंडे, शरद पवार यांच्याशी तर गद्दारी केलीच पण स्वत:च्या पहिलीशीसुद्धा गद्दारीच करणा-या सुरेश धसांना मी जिवंत असेपर्यंत राष्ट्रवादीत प्रवेश मिळणार नाही, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करून जिल्हा परिषदेवर बहुमत नसताना भाजपचा अध्यक्ष केल्याने राष्ट्रवादीने माजी राज्यमंत्री सुरेश धस यांचे पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन केले होते. त्यामुळे धसांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब आजबे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे ठरविले. सोमवारी त्यांचा राकाँत प्रवेश झाला. यानिमित्ताने आयोजित मेळाव्यात अजित पवारांनी सुरेश धसांवर सडेतोड टिका केली.यावेळी धनंजय मुंडे, आ.अमरसिंह पंडित, आ. सतीश चव्हाण, माजी. आ.उषा दराडे, माजी.आ. राजेंद्र जगताप, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, रेखा फड, संदिप क्षीरसागर, महेबूब शेख, तालुकाध्यक्ष आण्णासाहेब चौधरी, डॉ.विलास सोनवणे, परमेश्वर शेळके, सुनिल नाथ, शिवाजी नाकाडे, सुनिल पाटील, रामकृष्ण बांगर, जयसिंग सोळूंके, विठ्ठलराव सानप, विश्वनाथ जाधव, किशोर हंबर्डे आदींची उपस्थिती होती.आष्टी, पाटोदा, शिरूर हा मतदार संघ पवार साहेबांना मानणारा आहे. आम्ही ही या मतदार संघात अदिवासी विकास महामंडळ अध्यक्ष, महानंदाचे अध्यक्ष इतकेच नाहीतर सात खात्याचे राज्यमंत्रीसुद्धा केले. परंतु ज्यांच्या रक्तातच गद्दारी आहे, त्याला तुम्ही-आम्ही काही करू शकत नाही. सुरेश धससारखे लुंगे-सुंगे कार्यकर्ते किती आले अन् किती गेले, त्याचा राष्ट्रवादीवर काहीही फरक पडणार नाही, असे सांगितले.यावेळी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, महेबूब शेख, डॉ.शिवाजी राऊत, महेंद्र गर्जे, बाळासाहेब पवार आदींची भाषणे झाली. प्रस्ताविक आण्णासाहेब चौधरी, सुत्रसंचालन अमोल जगताप यांनी केले तर आभार दादासाहेब गव्हाणे यांनी मानले. मेळाव्यास हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या मतदार संघातील गद्दार नेतृत्वाला भाजपत प्रवेश करायचा आहे. आरे धस, या भाजपत नारायण राणेचा नंबर लागना, तर तुझा कवा येयचा. जिल्हा परिषदमध्ये आमच्या बहिणीला भूरळ घालून पाच जिल्हा परिषद सदस्यांचे पंधरा कोटी रुपये घेतले अन् त्या बिचाºया सदस्यांना किती दिले, हे देव जाणो. मी हे जे काही बोलत आहे, ते जबाबदारीने बोलत असल्याचेही मुंडे यांनी सांगितले. आता धसांनी आम्मा पक्षात जाण्याचाही सल्ला दिला. यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला.
‘आष्टीत जन्मला गद्दार माणूस !’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:27 AM