‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाळेत पाणी आणण्याची सक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 07:27 PM2019-04-29T19:27:10+5:302019-04-29T19:28:06+5:30
शहर परिसरातील जवळपास ३ लाख विद्यार्थी झाडाला पाणी देतील
औरंगाबाद : महाराष्ट्र दिन अर्थात १ मे रोजी शाळांमध्ये वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्या दिवशी झेंडावंदन व निकाल दाखविण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर शाळा परिसरातील झाडांना पाणी देण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांना सोबत पाण्याची बाटली आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या दिवशी शहर परिसरातील जवळपास ३ लाख विद्यार्थी झाडाला पाणी देतील व ‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ या उपक्रमाची सुरुवात होईल, असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी सांगितले.
एका दिवशी पाणी दिल्याने झाडे वाचतील का, असा प्रश्न केला असता शिक्षणाधिकारी जैस्वाल म्हणाले, झाडे जगली पाहिजेत, त्यासाठी झाडांना पाणी दिले पाहिजे, हे संस्कार मुलांवर रुजावेत हा यामागचा हेतू आहे. विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार १ मे रोजी शाळांमध्ये ‘वृक्ष संवर्धन लक्षवेध दिन’ या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. १५ जूननंतर नियमित शाळा उघडतील. तेव्हा प्रामुख्याने शहर व परिसरातील सर्व माध्यमांच्या, सर्व मंडळांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यादृष्टीने काही शाळांमध्ये भेटी देऊन या उपक्रमाबद्दल जागृती करण्यात आली.
शाळांकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ३ लाख मुले व शिक्षक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. शाळांमध्ये ‘ग्रीन औरंगाबाद, ग्रीन स्कूल’ ही संकल्पना रुजवायची आहे. शाळा परिसरातील झाडे जगवायची आहेत व ती वाढवायची आहेत. ज्यामुळे शहरातील प्रदूषण कमी होईल व पर्जन्यमान वाढीस मदत होईल.
पर्यावरणाचे संतुलन राखावेच लागेल
पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन पूर्वपदावर आणण्याची नैसर्गिक क्षमता वृक्षांमध्ये आहे. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे. च्निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल, तर झाडे लावणे व ती जगविणे गरजेचे आहे. त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल, असे शिक्षणाधिकारी जैस्वाल म्हणाले. १५ जूननंतर प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक हे आपापल्या शाळेतील एक झाड दत्तक घेतील. पाण्याच्या बाटलीमध्ये सुतळी टाकून तिचे दुसरे टोक झाडाच्या मुळाशी बुजविले जाईल. त्यामुळे किमान ७ दिवस बाटलीतील पाणी झाडांना मिळेल. हे पाणी झाडाच्या मुळाशी किमान २१ दिवस ओलावा ठेवते. ज्यामुळे झाडे वाढतील व पर्यावरणास मदत होईल, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.