मंत्रालयासह राज्यभरात फडकतात मराठवाड्यात निर्मित तिरंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:02 AM2021-08-15T04:02:11+5:302021-08-15T04:02:11+5:30
औरंगाबाद : नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीने राज्यात ७००० नवीन तिरंगा ध्वज विक्री केले. ...
औरंगाबाद : नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीने राज्यात ७००० नवीन तिरंगा ध्वज विक्री केले. उदगीर येथे निर्मित ८ बाय १२ फुटांचा तिरंगा रविवारी १५ ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयावर फडकणार आहेत.
तिरंगा ध्वज तयार करण्याची परवानगी महाराष्ट्रात फक्त नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीला देण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासूनही समिती उदगीर येथे तिरंगा ध्वजाचे खादी कापड तयार करते आहे. यासंदर्भात समितीचे सचिव व माजी आ. ईश्वरराव भोसीकर यांनी सांगितले की, लॉकडाऊनचा परिणाम ध्वज निर्मितीवर झाला आहे. मागील आठवडाभरात समितीने राज्यात ७००० नवीन ध्वज विक्री केले आहे. यात ५५ लाख रुपयांची उलाढाल झाली. यंदा मुंबई येथील मंत्रालयात उदगीर येथे निर्मित तिरंगा ध्वज स्वातंत्र्यदिनी फडकणार आहे. नुकताच समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हा ध्वज सन्मानपूर्वक मंत्रालयात नेऊन दिला. या ध्वजाचा आकार १४ बाय २१ फुट एवढा आहे. मागील वर्ष लॉकडाऊनमुळे तिरंगा विक्रीवर मोठा परिणाम झाला होता, असेही त्यांनी नमूद केले.
चौकट
औरंगाबादेत ३०० घरांवर पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकणार
शहरातील खादी ग्रामोद्योग भंडारचे व्यवस्थापक रां. ग. राऊत यांनी सांगितले की, येथून मागील आठवड्यात ७०० तिरंगा ध्वज विक्री झाले. यात ९ लाखांची उलाढाल झाली. विशेष म्हणजे यंदा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त नागरिकांनी घरावर उभारण्यासाठी ३५० तिरंगा ध्वज विकत नेले आहेत. पहिल्यांदाच नागरिक आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविणार आहे. यात २ बाय ३ फुटांचे ध्वज यंदा जास्त विकल्या गेले.