कुलगुरू वि.ल. धारुरकर यांच्या लाच घेतानाच्या व्हिडिओने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 08:11 PM2019-09-06T20:11:31+5:302019-09-06T20:13:38+5:30
त्रिपूरातील स्थानिक वृत्तवाहिनीने केले स्टिंग
औरंगाबाद : त्रिपूरा येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि.ल. धारुरकर यांचा छपाईच्या कंत्राटात १० टक्के कमिशन मागण्याचा आणि कंत्राटदाराच्या घरीच पैसे स्विकारतानाचे स्टिंग ऑपरेशन त्रिपुरातील एका वृत्तवाहिनीने केले आहे. याविषयी राष्ट्रीय वृत्तपत्र ‘द हिंदू’मध्ये बातमी छापण्यात आली आहे. ही बातमी आणि पैसे स्विकारतानाचा व्हिडिओ शुक्रवारी (दि.६) महाराष्ट्रभर व्हायरल झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्रिपुरा केंद्रीय विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. धारुरकर यांचे ‘व्हॅनगार्ड न्यूज’ या स्थानिक वृत्त वाहिनीने ‘ऑपरेशन व्हाईट कॉलर’ नावाने स्टिंग केले आहे. १४ लाख रुपयांच्या प्रिटिंगच्या बिलाचा धनादेश आज मिळणार आहे. त्याचे पैसे आज द्या आणि ५ लाख ८० हजार रुपयांच्या प्रिंटिंगच्या वर्क ऑर्डरचे पैसे पुढच्या महिन्यात दिले तरी चालतील. ६० लाख रुपयांच्या वर्क ऑर्डरचे १० टक्केप्रमाणे पैसे द्यावे लागतील,असेही बोलताना डॉ. धारुरकर दिसत आहेत. यामध्ये एवढी मार्जीन नाही सर, असे सांगत प्रिंटिंग फर्मचा प्रतिनिधी लाचेची रक्कम कमी करण्याची विनंती करतो आणि रखीए सर म्हणत पैशांचे बंडल डॉ. धारुरकर यांचया हातात देतो.
डॉ. धारुरकरांसोबत असलेली एक व्यक्ती लाचेची ही रक्कम बॅगेत ठेवतानाही या व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे. हे स्टिंग डॉ. धारुरकर यांच्या कुलगुरू कार्यालयातील अँटिचेबर आणि प्रिंटिंग फर्मचे प्रतिनिधी सुरेंद्र सेठीया यांच्या कोलकात्यातील निवासस्थानी करण्यात आल्याचा दावाही यात केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना व्हॅनगार्ड वृत्तवाहिनीचे संपादक सेवक भट्टाचार्जी म्हणतात की, डॉ. धारुरकर हे त्रिपूरा विद्यापीठात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत आहेत. त्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा आणि लौकीक अबाधित राखण्यासाठी आम्ही व्हिसलब्लोअर म्हणून काम करत आहेत. याविषयीचा व्हिडिओ आणि पोस्ट फेसबुक, व्हाटस्अपवर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. यावर मोठ्या प्रमाणात चर्चाही करण्यात येत आहे. यात डॉ. धारुरकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या पीएच.डी. शोधप्रबंधांची चौकशा करण्याची मागणीही सोशल मिडियातुन करण्यात येत आहे.
माझ्याविरोधातील षडयंत्र
या व्हायरल व्हिडिओ आणि पोस्टविषयी कुलगुरू डॉ. वि.ल. धारुरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे आपल्याविरोधात स्थानिकांनी रचलेले षडयंत्र असल्याचे सांगितले. सध्या मी व्यवस्थित असून, नियमित कामकाज करत असल्याचेही डॉ. धारुरकर यांनी सांगितले.