छत्रपती संभाजीनगर :लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खा. चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्यात झालेल्या ’तू, तू, मैं, मैं’ च्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्रीवर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तथापि, या बैठकीचे खैरे व दानवेंना आमंत्रण नव्हते.
या बैठकीत त्यांनी ’आपण का हरलो आणि आता कसे जिंकायचे’ याविषयी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याची माहिती सूत्राने दिली. आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. मागील पराभवानंतरही दुसऱ्या दिवसापासून खैरे हे २०२४ ची निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. असे असताना विरोधी पक्षनेते दानवे यांनी पक्षाने आदेश दिल्यास आपण लोकसभेची निवडणूक लढवू, असे जाहीर केले.
यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये वादावादी झाली. ही बाब ‘मातोश्री’पर्यंत पोहोचली. उद्धव ठाकरे यांनी तडकाफडकी मंगळवारी मातोश्रीवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीला जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजू राठोड, पूर्व विधानसभा शहर संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, पश्चिम विजय वाघचौरे, आणि मध्य विभागातील शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, संघटक गोपाल कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, देवयानी डोणगावकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पक्षप्रमुखांनी ‘गत निवडणुकीत आपला पराभव का झाला, आगामी निवडणूक पक्षासाठी कशी असेल’, असे विचारले, पण उमेदवार कोण असेल, याविषयी काही सांगितले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
दोन्ही नेत्यांना बैठकीपासून ठेवले दूर‘मातोश्री’वर झालेल्या याच्या बैठकीला छत्रपती संभाजीनगरातील दोन्ही नेत्यांना पक्षप्रमुखांनी दूर ठेवले. त्यांना दूर ठेवून पदाधिकाऱ्यांशी थेट संंवाद साधून त्यांच्या मनात काय चालू आहे,हे जाणून घेण्याचा प्रयत्न पक्षप्रमुखांनी केल्याची चर्चा आहे.