टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीत गुंतविलेले १२ लाख भागीदारानेच हाडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:18 PM2019-04-12T23:18:28+5:302019-04-12T23:18:47+5:30
भागीदारीत टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय करण्यासाठी दिलेले ११ लाख ८६ हजार रुपये कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वत:च्या बँक खात्यात जमा करून एक जणाने अन्य दोन भागीदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ११ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
औरंगाबाद : भागीदारीत टुर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसाय करण्यासाठी दिलेले ११ लाख ८६ हजार रुपये कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वत:च्या बँक खात्यात जमा करून एक जणाने अन्य दोन भागीदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात ११ एप्रिल रोजी गुन्हा नोंदविण्यात आला. अनिल नवनाथ गिरी (रा.श्रीकृष्णनगर, शहानूरवाडी) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मोहन अण्णासाहेब हाडे (रा. श्रीहरी पार्क, श्रीकृष्णनगर, शहानूरवाडी) हे एका खाजगी शाळेत ग्रंथपाल आहेत. आरोपी गिरी हा त्यांच्या ओळखीचा आहे. २०१५ मध्ये गिरी बेरोजगार असल्याने त्याने काम मिळवून द्या, अशी विनंती हाडे यांना केली होती. यामुळे हाडे यांनी त्यांचे मित्र कैलास पवार यांच्याकडे कामाला लावले. गिरी याचा ट्रॅव्हल्स व्यवसायातील अनुभव पाहून पवार यांनी हाडे यांना फोन करून गिरीसोबत भागीदारीत ट्रॅव्हल्स कंपनी सुरू करू असे सांगितले. मात्र ही भागीदारी करताना तुम्हाला इमानदारी राखावी लागेल, ही अट हाडे यांनी गिरीला घातली. तेव्हा गिरीने डोळ्यातून अश्रू आणून त्यांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. यानंतर त्यांच्यात भागीदारीचा करारनामा झाला. करारनाम्यानुसार सहल बुकिंगसाठी लोकांकडून घेतली जाणारी रक्कम ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्यात जमा करणे गिरी यांना बंधनकारक केले. गिरीने मात्र लोकांकडून घेतलेली रक्कम ट्रॅव्हल्स कंपनीच्या संयुक्त खात्यात जमा न करता स्वत:च्या एक्सपाँडेबल हॉलिडे या बँक खात्यात जमा केले. याविषयी हाडे आणि पवार यांनी गिरीकडे विचारणा केली असता त्याने आपल्या कंपनीची जीएसटी नोंदणी क्रमांक अद्याप प्राप्त झाला नाही. ग्राहकांना जीएसटीची बिले द्यावी लागत असल्याने वैयक्तिक खात्यात रक्कम जमा करीत असल्याचा खुलासा केला. ही रक्कम सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय सुरुवातीलाच आपल्याला नफा झाल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान आणखी काही सहलींची बुकिंग आल्यानंतर विमान आणि रेल्वे तिकीट बुकिंग करणे, हॉटेल्स बुकिंग करण्यासाठी गिरीने भागीदारांकडून पैसे घेतले. एक रुपयाही त्याने कंपनीच्या खात्यात जमा केला नाही. यामुळे हाडे आणि पवार यांनी त्यास हिशेब मागितला असता त्याने हिशेब देण्यास टाळाटाळ केली. शेवटी त्याने तुम्हाला ११ लाख ८६ हजार रुपये देणे असल्याचे सांगितले आणि ही रक्कम त्याच्याकडे नसल्याचे सांगून पैसे देण्यास नकार दिला.
भागीदारी केली रद्द
आरोपी गिरी ११ लाख ८६ हजार रुपये परत देत नसल्याचे पाहून हाडे आणि पवार यांनी दोन साक्षीदारांसमोर गिरीला बोलावून भागीदारीतील कंपनी रद्द केली. त्यानंतर काही दिवसांनी पैसे देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, असे तो म्हणू लागल्याने हाडे यांनी डिसेंबर २०१८ मध्ये आरोपी गिरीविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशी करून याप्रकरणी गुरुवारी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक तायडे तपास करीत आहेत.
-----------