पैठण येथील बँक व एटीएम फोडणारे चोरटे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 07:47 PM2019-06-14T19:47:01+5:302019-06-14T19:48:25+5:30
बँक व एटीएम फोडून चोरी करण्यास चोरट्यांना अपयश आले होते
जायकवाडी (औरंगाबाद ) : पैठण औद्योगिक वसाहत परिसरातील एसबीआय बँकेची ईसारवाडी शाखा व पिंपळवाडी फाट्यावरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल तीन महिन्यानंतर पोलिसांना आरोपी ताब्यात घेण्यात यश आले.
या बाबत अधिक माहिती अशी की, दि. ११ एप्रिलला मध्यराञी २ ते ४ वाजे दरम्यान चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजुने खिडकी तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. ही बाब बँक कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी निदर्शनास आली. एमआयडीसी पैठण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी सईद शेख वय (२०) व नदीम शेख (१९) दोन्ही रा.पिंपळवाडी ता.पैठण यांना आज अटक केली.
तसेच मागील महिन्यात पिंपळवाडी फाट्यावरील एक एटीएम मध्यरात्री चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये सुद्धा हेच आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई औंरगाबाद ग्रामीण पोलिस अधिकक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पैठण पोलिस ठाणेचे सपोनि अर्चना पाटील, फौजदार राहुल पाटील, पोलिस कर्मचारी शरद पवार ,तुकाराम मारकळ , रामेश्वर तळपे, कोमल देहाडराय यांनी केली.