दोन भाच्यांनी केला मामाचा चाकूने खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:15 AM2018-06-15T00:15:20+5:302018-06-15T00:15:35+5:30
‘तू आम्हाला खुनाच्या गुन्ह्यात अडकविले,’ असे म्हणून दोन भाच्यांनी मामाचा धारदार चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.१३) रात्री नवाबपूर शिवारात घडली. घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगापूर : ‘तू आम्हाला खुनाच्या गुन्ह्यात अडकविले,’ असे म्हणून दोन भाच्यांनी मामाचा धारदार चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.१३) रात्री नवाबपूर शिवारात घडली. घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीधर ऊर्फ मजितराव वाल्मीक काळे (६५), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे, तर रवी श्रीमंत भोसले (२२२), शहानूर सुभाष चव्हाण (१९, दोघे रा. नवाबपूर वाडी), अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथील श्रीधर ऊर्फ मजितराव वाल्मीक काळे हे बुधवारी (दि.१३) सायंकाळी नवाबपूर येथील सासुरवाडीस आले होते.
दरम्यान, रात्री २.३० वाजेच्या सुमारास घटनेतील मयताचे भाचे रवी भोसले, शहानूर चव्हाण हे तिथे आले व त्यांनी तू आम्हाला खुनाच्या गुन्ह्यात अडकविले असे म्हणून मयताशी वाद घातला.
यावेळी आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार चाकूने श्रीधर यांच्या पोटात दहा ते बारा वेळेस भोसकून गंभीर जखमी केले. तसेच जवळ असलेल्या सुभाष मगर यांच्या शेतात आणून टाकले. या घटनेत गंभीर जखमी होऊन श्रीधर यांचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे, गंगापूर ठाण्याचे पोनि. सुनील बिर्ला, सपोनि. जमधडे यांच्यासह पोलीस पथकाने पाहणी केली.
अवघ्या तासाभरात पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी रवी भोसले, शहानूर चव्हाण यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.