एसआरपी भरतीत बनवाबनवी करणाऱ्या दोन उमेदवारांचा भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 05:43 PM2018-03-30T17:43:22+5:302018-03-30T17:44:52+5:30
सातारा परिसरातील भारत बटालियन येथे सुरू असलेल्या भरती प्रक्रिये दरम्यान बनवाबनवी करणाऱ्या दोन उमेदवारांचा चाणाक्ष अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला.
औरंगाबाद: सातारा परिसरातील भारत बटालियन येथे सुरू असलेल्या भरती प्रक्रिये दरम्यान बनवाबनवी करणाऱ्या दोन उमेदवारांचा चाणाक्ष अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. भरती प्रक्रियेचे चित्रण करणाऱ्या व्हिडिओ कॅमेऱ्यातही आरोपींची बनवा-बनवी कैद झाली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोन्ही उमेदवारांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
रमेश शांताराम दांडगे(चेस क्रमांक २८६३,रा. रा. दहिगाव, ता.सिल्लोड) आणि अमोल लुकड वाणी(चेस क्रमांक २८६५,रा. दहिगाव, ता. कन्नड)अशी आरोपी उमेदवारांची नावे आहेत. सातारा पोलिसांनी सांगितले की, सातारा परिसरातील भारत बटालियन या राज्य राखीव दलातील रिक्त पदासाठी पंधरा दिवसापासून भरती प्रक्रिया सुरू आहे. १७ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान सहायक समादेश मोहमंद इलियास मोहमंद सईद(५४)हे उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली. या मैदानी चाचणी दरम्यान उमेदवार रमेश दांडगे आणि अमोल वाणी यांच्यासह अन्य उमेदवारांची धावण्याचे प्रात्यक्षिक घेतले. यावेळी रमेश आणि अमोल यांनी संगणमत करून बनवाबनवी केल्याचे निदर्शनास आले. यावेळी रमेशने पळण्याचे टोकन घेतल्यानंतर तो अडिच किलोमिटर पळाला आणि त्याने त्याचे टोकन आरोपी अमोल लुकड याला देऊन त्याला पुढील अंतर पळायला सांगितले. त्यानुसार अमोल हा रमेशच्यावतीने अडिच किलोमिटर अंतर पळून त्याने रमेशला गुण मिळवून दिले.
हा प्रकार मात्र त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आला नाही. मात्र त्यादिवशी आरोपीसोबत धावणाऱ्या अन्य उमेदवारांना हा प्रकार माहित असल्याने त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. त्यानंतर भरती प्रक्रियेतील भरती अधिकाऱ्यांनी त्या दिवशी केलेले व्हिडिओ चित्रण तपासले. या चित्रणामध्ये आरोपींची बनवा-बनवी त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही बाब आरोपींना कार्यालयात बोलावून त्यांच्याविरोधात शुक्रवारी सातारा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.