दोन नगरसेवक पुन्हा निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:06 AM2018-03-20T01:06:34+5:302018-03-20T10:47:38+5:30
मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या दोन नगरसेवकांनी सोमवारी रात्री महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणे गोंधळ घातला. त्यामुळे दोघांना एक दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय महापौैर नंदकुमार घोडेले यांनी घेतला
औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाच्या दोन नगरसेवकांनी सोमवारी रात्री महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नेहमीप्रमाणे गोंधळ घातला. त्यामुळे दोघांना एक दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय महापौैर नंदकुमार घोडेले यांनी घेतला. यापूर्वी अनेकदा या नगरसेवकांनी सभेत गोंधळ घातला. एकावर तर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला. गोंधळी नगरसेवकांचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला पाठविण्याचा निर्णय सभेने घेतला.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत महापालिका सर्वसाधारण सभा सुरू होती. भडकलगेटचे एमआयएम नगरसेवक गंगाधर ढगे यांनी लेखाशीर्षक बदलण्याचा ठराव ठेवला होता. त्यांनी अर्थसंकल्पात सुचविलेले रस्त्याचे काम १०० कोटींच्या कामांमध्ये आले आहे. त्यामुळे रस्त्याचा निधी दुसरीकडे वळविण्याचा ठराव ढगे यांचा होता. या संदर्भात महापौैर घोडेले, कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेत होते. याचवेळी ढगे यांनी आवाज चढवून प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. शब्दाला शब्द वाढत गेला. ढगे यांनी महापौैरांवर आरोप सुरू केले. त्यामुळे त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर नगरसेवक मकरंद कुलकर्णी यांनी वॉर्ड क्र. ४० गणेशनगर येथील चौैकात ‘हिंदू राष्ट्र चौैक’ म्हणून कमान उभारणीचा प्रस्ताव ठेवला होता.
या ठरावाला एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी कडाडून विरोध दर्शवीत विषयपत्रिका फाडली. महापौैरांनी त्यांना वारंवार शांत राहण्याची सूचना केल्यानंतरही त्यांचा गोंधळ कमी होत नव्हता. शेवटी त्यांचेही नगरसेवकपद एक दिवसासाठी रद्द करण्यात येत असल्याची घोषणा महापौैरांनी केली. एमआयएम पक्षाकडून असे दबावतंत्र खपवून घेतले जाणार नाही, अशी ताकीदही महापौरांनी गटनेता नासेर सिद्दीकी यांना दिली. तुमच्या पक्षाच्या नगरसेवकांना समज द्या, महापालिकेतील हे सर्वोच्च सभागृह असून, येथील कामकाजाला काही नियम आणि शिष्टाचार आहेत.