दोन जिल्ह्याच्या वादातून शेतकऱ्यांना भूसंपादनाचे धनादेश मिळण्यास लागली २१ वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 06:54 PM2019-01-21T18:54:12+5:302019-01-21T18:59:07+5:30
शेतकऱ्यांना मोबदला कुणी द्यायचा, यावरुन जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या वादात २१ वर्षे उलटून गेले.
लाडसावंगी (औरंगाबाद ) : परिसरात १९९८ मध्ये कऱ्हाडी नदीवर बाबूवाडी मध्यम प्रकल्प झाला होता. परंतु त्या धरणात गेलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नव्हता, तो लाडसावंगी येथे सोमवारी वाटप करण्यात आला. धनादेश मिळाल्याने शेतकरी आनंदी झाले आहेत.
२००४ मध्ये धरणाचे काम पूर्ण झाले. या धरणाची पाळू लाडसावंगी (ता. औरंगाबाद) क्षेत्रात आहे व पाणी साठवण जालना जिल्ह्यातील भाकरवाडी (ता. बदनापूर) येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर झाले. हे धरण औरंगाबाद जि.प.ने बांधले, पण यात जालना जिल्ह्यातील भाकरवाडीच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. यामुळे शेतकऱ्यांना मोबदला कुणी द्यायचा, यावरुन जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या वादात २१ वर्षे उलटून गेले. यावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी हा वाद मिटवून भाकरवाडी येथील शेतकऱ्यांना लाडसावंगी येथे धनादेश वाटप केले.
यावेळी औरंगाबाद जि.प.चे मुख्य कार्यकारी आधिकारी पवनीत कौर, सभापती राधाकिसन पठाडे, सरपंच सुदाम पवार, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत घुगे, नामदेव तिडके, रामबाबा शेळके, नामदेव तिडके, जब्बार खान, स्मिता जैन, अनिल शेजूळ, शफिक बागवान व शेतकरी हजर होते.