समीर पठाण
जायकवाडी : पैठण तालुक्यातील पिंपळवाडी-पिराची ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. १७ जागांसाठी ४७ उमेदवार रिंगणात आहेत. सोशल मीडियावर प्रत्येक उमेदवाराचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. गावातील चौकाचौकात निवडणुकांच्या गप्पांचे फड रंगले असून, रणनीती आखली जात आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, पिंपळवाडी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये असलेल्या अमरापूर वांघुडी व गणेशनगर या गावांत प्रचाराचा धुराळा उडाला आहे.
जायकवाडी परिसरातील सर्वात मोठ्या व सहा प्रभाग असलेल्या पिंपळवाडी पिराची ग्रुप ग्रामपंचायतीत १७ सदस्य आहेत. सुरुवातीला गावात तिंरगी लढत होण्याची दाट शक्यता होती. मात्र, अतिवेगाने घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे तिरंगी लढतीची शक्यता संपुष्टात येऊन या निवडणुकीत दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे. पिंपळवाडी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये मंत्री संदीपान भुमरे यांच्या गटाचे दोन्ही पॅनल समोरासमोर लढत आहेत.
७१ वर्षीय पद्माकर जैन रणांगणात
पिंपळवाडी ग्रामपंचायतच्या इतिहासात पहिल्यांदाच चार पती-पत्नीच्या जोड्या निवडणूक लढवीत आहेत. शिवसेनेचे दोन्ही पॅनल समोरासमोर लढत असून, काटे की टक्कर मानली जात आहे. या निवडणुकीत विद्यमान सात सदस्यांनी पुन्हा उडी घेतली आहे. या निवडणुकीत ७१ वर्षांचे पद्माकर बाबूराव जैन यांनीही उडी घेतली आहे.
-------------
अशी आहे ग्रामपंचायतीची रचना
ग्रामपंचायत सदस्य संख्या :- १७
एकूण प्रभागांची संख्या : ०६
एकूण मतदार : ६७४८
महिला मतदार : ३०७४
पुरुष मतदार : ३६७४
फोटो कॅप्शन :
पिंपळवाडी पिराची ग्रुप ग्रामपंचायतची इमारत.
२) पद्माकर जैन सर्वात वयोवृद्ध उमेदवार