एसटी पंक्चर झाल्याने दोन तास विद्यार्थी थंडीत कुडकुडले,'लोकमत'ने दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:51 AM2018-01-19T11:51:23+5:302018-01-19T11:58:01+5:30
सहलीचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांवर ' एसटी ' पंक्चर झाल्याने दोन तास कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रस्त्यावर बसण्याची वेळ गुरुवारी रात्री आली. बसमधील निरुपयोगी जॅकच्या मदतीने घामाघूम होऊन टायर बदलण्याची कसरत चालक करीत होता. परंतु त्यास यश मिळत नव्हते. याच वेळी दिवसभराचे काम आटोपून कार्यालयातून बाहेर पडलेल्या 'लोकमत' च्या प्रतिनिधीस ही बाब निदर्शनास आली आणि त्याने तात्काळ मदतीचा हात दिल्याने काही वेळात एसटी दुरुस्त होऊन पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : सहलीचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांवर ' एसटी ' पंक्चर झाल्याने दोन तास कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रस्त्यावर बसण्याची वेळ गुरुवारी रात्री आली. बसमधील निरुपयोगी जॅकच्या मदतीने घामाघूम होऊन टायर बदलण्याची कसरत चालक करीत होता. परंतु त्यास यश मिळत नव्हते. याच वेळी दिवसभराचे काम आटोपून कार्यालयातून बाहेर पडलेल्या 'लोकमत' च्या प्रतिनिधीस ही बाब निदर्शनास आली आणि त्याने तात्काळ मदतीचा हात दिल्याने काही वेळात एसटी दुरुस्त होऊन पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
धायफळ ( ता. लोणार ) येथील जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवी वर्गातील चाळीसवर विद्यार्थी - विद्यार्थीनी आणि राजेश इंगळे, शिवाजी डोंगरदिवे, मुरलीधर टाकरस , नंदकिशोर गाडवे, रेणुका फोलाने हे पाच शिक्षक बुधवारी एसटी ( एमएच -४० , वाय -५८०२ ) एसटीने सहलीला निघाले होते. यावेळी 'एसटी 'वर मेहकर आगाराचे चालक सुनीन राठोड होते. राजूर , वेरूळ , दौलताबाद , शिर्डी अशा दोन दिवसाच्या सहलीनंतर गुरुवारी ( दि. १८ ) रात्री परतीचा प्रवास सुरु झाला. शिर्डीवरून औरंगाबादेत प्रवेश होत नाही तोच रात्री १०.३o वाजता जालना रोडवर, लोकमत भवनसमोर या बसचे पुढचे टायर पंक्चर झाले. बसमध्ये अतिरिक्त टायर आणि जॅक होते. त्यामुळे काही मिनिटांत टायर बदलले जाईल , या विचाराने विद्यार्थी, शिक्षक बसमधून बाहेर पडले.
कुडकुडणाऱ्या थंडीत सर्वजण टायर बदलण्याची वाट बघत होते. तर तिकडे चालक सुनील राठोड हे चाकाचे नट बोल्ट उघडत होते. नट बोल्ट सैल केल्यानंतर जॅक लावण्यासाठी सुनील राठोड बसखाली शिरले. अंधार असल्याने शिक्षकांनी त्यांच्या मदतीसाठी मोबाईलद्वारे प्रकाश व्यवस्था केली. परंतु येथूनच खरी सुरूवात झाली ती टायर बदलण्याची कसरत. बसमधील जॅक कुचकामी ठरत होते. अथक परिश्रमानंतरही काही केल्या जॅक वर जायला तयार नव्हते. जॅक पूर्णपणे जाम झालेले होते. जॅकसोबत सुरू असलेल्या कसरतीने राठोड यांना ऐन थंडीत चांगलाच घाम फुटला होता . तरीही जॅक लावण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती. या सगळ्यात रात्रीचे ११ वाजले. काही विद्यार्थी रस्त्यावर बसलेले आणि चालक बसखाली शिरून काहीतरी दुरुस्ती करीत असल्याचे दुचाकीवरून जाणाऱ्या शैलेशसिंग राजपूत या युवकाच्या निदर्शनास आले. जॅकची अवस्था पाहून त्याने परिचयातील व्यक्तीकडून जॅक आणले. किमान आता टायर दुरुस्त होईल , असे वाटले. पण हे जॅक 'एसटी'ला व्यवस्थीत बसत नव्हते. ही परिस्थिती पाहून शिक्षकांनी मोबाईलच्या मदतीने सिडको बसस्थानकाचा दूरध्वनी क्रमांक शोधून काढला. परंतू; काही प्रतिसाद मिळत नव्हता
रस्त्याने ये -जा करणारे क्षणभर थांबून , विचारपूस करून निघून जात होते. जवळपास ११.१५ वाजले होते. दिवसभराच्या कामानंतर कार्यालयाच्या बाहेर पडलेल्या 'लोकमत ' च्या एका प्रतिनिधीस टायर बदलण्यासाठी सुरू असलेला सारा खटाटोप आणि त्यामुळे ऐन थंडीत कुडकुडत बसलेले विद्यार्थी निदर्शनास पडले. जॅकच्या अडचणीमुळे टायर बदलणे अशक्य होत असल्याचे लक्षात आले. प्रारंभी सिडको बसस्थानकाच्या दूरध्वनीवर संपर्क केला असता चालकाला रिक्षा करून आगारात पाठवा , असे अजब उत्तर मिळाले. जॅक लवकर मिळावे म्हणून प्रतिनिधीने सरळ चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेच्या परिससरातील सिडको बसस्थानकाचे आगार गाठले.
तत्पूर्वी आगार व्यवस्थापक प्रवीण भोंडवे यांना मोबाईलवरून घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तात्काळ मदतीची तयारी दर्शविली होतीच. आगारात पोहोचल्यावर मुख्य कारागिरांनाही परिस्थिती सांगितली. त्यांनी जॅक आणि टायर घेऊन जाण्याची सुचना कारागिरांना केली . शिवाय त्यांना आगार व्यवस्थापकांचा फोनही येऊन गेला. एम . वाय . सोनवणे आणि अमरनाथ कदम हे एका एसटीतून टायर , जॅक घेऊन पंक्चर झालेल्या बसजवळ पोहोचले. तोपर्यंत रात्रीचे बारा वाजले होते. १० .३० वाजेपासून विद्यार्थी रस्त्यावर बसून होते, तर काही लहान विद्यार्थी बसमध्ये झोपी गेले होते. आगारातील कारागीरांनी क्षणाचाही विलंब न लावता जॅक लावला. पंक्चर झालेल्या टायरच्या जागी आगारातून आणलेले टायर बसविण्यात आले आणि एसटी रवाना होण्यासाठी सज्ज झाली. झोपेने डोळे जड झालेल्या विद्यार्थ्यांना टायर दुरुस्त झाल्याची गोष्ट मोठा आनंद देऊन गेली. पटापट विद्यार्थी बसमध्ये चढले आणि आपापल्या जागा पकडल्या. समयसूचकता दाखवत टायर बदलण्यासाठी 'लोकमत ' च्या प्रतिनिधीने केलेल्या मदतीचे आणि एसटी महामंडळाच्या अधिकारी - कर्मचा-यांनी पार पाडलेल्या कर्तव्याचे आभार मानत शिक्षक रात्री १२ .२० वाजेच्या सुमारास पुढील प्रवासासाठी रवाना झाले.
जॅकची अवस्था उघड
या घटनेमुळे एसटी बसमधील जॅकची अवस्था उघड झाली. बसगाडयांमध्ये जुनाट , नादुरूस्त जॅक दिले जात आहेत . त्यामुळे दररोज अनेक चालकांना एसटी पंक्चर झाल्यावर कसरत करावी लागते. त्याचा फटका प्रवाशांना बसतो . त्यामुळे ही स्थिती दूर होण्यासाठी नवीन , चांगल्या अवस्थेतील जॅक ' एसटी' त ठेवण्याची गरज आहे.