औरंगाबाद : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्प क्षेत्रांसह गोदावरी पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे जायकवाडीसह विभागातील अनेक धरणे पाण्याचा येवा शून्य आहे. नाशिकपासून औरंगाबादपर्यंतच्यागोदावरी नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे विभागातील गोदापात्रावरील विष्णुपुरी वगळता सर्व प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. ( Two months of monsoon have passed, but the Godavari catchment area is dry)
कोकणासह पुणे विभागातील काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले तर नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलप्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे हा भाग कोरडाठाक दिसतो आहे. शहागड आणि खडका हे दोन बंधाऱ्यासह विभागातील मोठे प्रकल्प निम्न दुधना ८३ टक्के आणि विष्णुपुरी प्रकल्पात ८८ टक्के पाणीसाठा सध्या आहे. तर जायकवाडी, येलदरी, सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, पैनगंगा, मनार, निम्न तेरणा, सिना कोळेगाव या सहा प्रकल्पांत कमी जलसाठा आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी प्रकल्पात सध्या ३७.११ टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला ४६ टक्के जलसाठा होता. १ जूनपासून आतापर्यंत फक्त १६५ क्यूसेक पाणी धरणात आले आहे.
निम्न दुधना प्रकल्पात मागील वर्षी २० टक्के पाणी होते. येलदरी प्रकल्पात यंदा ६१ टक्के जलसाठा असून, मागील वर्षी ३१ टक्के साठा होता. सिद्धेश्वर प्रकल्पात ६४ टक्के जलसाठा असून, मागील वर्षी ५३ टक्के साठा होता. माजलगाव धरणात ३१ टक्के जलसाठा सध्या आहे. गेल्यावर्षी ५३ टक्के जलसाठा होता. मांजरा प्रकल्पात २२ टक्के साठा असून, मागीलवर्षी ८ टक्के जलसाठा होता. पैनगंगा प्रकल्पात ६६ टक्के साठा सध्या आहे. मागीलवर्षी ५० टक्के साठा होता. मनारमध्ये ९१ टक्के साठा असून, गतवर्षी ६४ टक्के साठा होता. निम्न तेरणा प्रकल्पात ५६ टक्के साठा असून, गतवर्षी १ टक्के साठा होता. विष्णुपुरी प्रकल्पात सध्या ८८ टक्के जलसाठा आहे. तो मागील वर्षी ७८ टक्के होता.
मराठवाड्यात यंदा झालेला पाऊसजुलै महिना संपत आला असून, अद्याप विभागातील धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी धरणांची तहान वाढली आहे. विभागाचे वार्षिक पर्जन्यमान ६७९ मि.मी. इतके असून, सध्या एकूण सरासरीच्या ३९३ मि.मी.च्या आसपास पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या सरासरीच्या तुलनेत आजवर ६८ टक्के पाऊस झाल्याची नोंद विभागीय पातळीवर घेण्यात आली आहे.
गोदावरी पाणलोटक्षेत्रात कमी पाऊसगोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस होण्यामागे मूळ कारण म्हणजे, यंदा सह्याद्रीच्या रांगामध्ये मान्सून जास्त प्रमाणात बरसला. नाशिक, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा आहे. गोदावरी पाणलोट क्षेत्रात पाऊस न झाल्यामुळे मोठ्या धरणांत कमी जलसाठा आहे. ऑगस्ट महिन्यांत या पट्ट्यांत पाऊस होणे शक्य आहे. असे हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.