औरंगाबाद : केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत औरंगाबाद शहरात आठ ठिकाणी आधुनिक व्हर्टिकल गार्डन उभारण्यात येत आहेत. शहरातील पहिले उद्यान सिद्धार्थ उद्यानासमोरील नाल्यावर उभारण्यात आले. यात आणखी दोन उद्यानांची भर पडली असून, मनपा मुख्यालयाजवळ वज्द मेमोरिअल हॉलजवळ आणि महावीर चौकातील काम पूर्ण झाल्याचे उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या १५ वित्त आयोगांतर्गत मनपाला निधी मिळाला. हवेच्या शुद्धतेसाठी या निधीचा वापर करावा असे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने शहरात आठ ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान अधीक्षक डॉ. विजय पाटील यांच्या देखरेखीखाली शहरात विविध ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारण्यात येत आहेत. महापालिका मुख्यालयाजवळ वज्द मेमोरिअल हॉलच्या बाजूला असलेल्या नाल्यावर व्हर्टिकल गार्डनचे काम पूर्ण करण्यात आले. तसेच महावीर चौकातील कामदेखील पूर्ण झाले. यापूर्वी सिद्धार्थ उद्यानाशेजारी व्हर्टिकल गार्डनचे काम पूर्ण झालेले आहे. नागेश्वरवाडी, सरस्वती भुवन महाविद्यालय मार्ग, सिडको बस स्थानक, जुना मोंढा, औरंगपुरा व अन्य ठिकाणी व्हर्टिकल गार्डन उभारण्यात येत आहेत. या उद्यानांमुळे हवा शुद्ध होण्यास मदत होईल तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडेल. शहरातील नागरिक आणि पर्यटक यांच्या दृष्टीने हे उपक्रम महत्त्वाचे आहेत.
विविध चौकात कारंजेहवेतील धुळीचे कण कमी व्हावेत यासाठी नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत आठ ठिकाणी कारंजे बसविले जात आहेत. यातील महावीर चौक व दमडी महल येथील काम पूर्ण होत आले असून, अन्य ठिकाणचे काम प्रगतिपथावर असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
देखभाल दुरुस्ती अशक्यसिद्धार्थ उद्यानासमोरील पहिले व्हर्टिकल गार्डनची अवस्था दिवसेंदिवस खराब होत चाचली आहे. अत्यंत छोट्या-छोट्या प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये अत्यंत नाजूक स्वरूपाची झाडे लावली आहेत. या कुंड्यांना पाणी मिळत नसल्याने ती पिवळी पडत आहेत. काही ठिकाणी कुंड्यांवरील जाळीही गायब झाली आहे.