औरंगाबाद : ‘स्पा’च्या नावाखाली आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालविणारे आरोपी बनावट पासपोर्ट तयार करण्यासारख्या देशविघातक कामात गुंतल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकारांना सांगितले. ‘स्पा’मध्ये सापडलेल्या ९ मुलींपैकी एकीकडे दोन पासपोर्ट मिळाले तर अन्य एका मुलीचा पासपोर्ट मिळाला; परंतु ती गायब आहे. यामुळे पोलिसांनी स्पा मालकाला पकडण्यासाठी गती दिली आहे.
या सेक्स रॅकेटमध्ये थायलंडच्या मुली देहविक्री व्यवसायासाठी आणल्या जात होत्या, अशी माहितीही पोलिसांच्या कानावर आली आहे. याविषयी बोलताना आयुक्त म्हणाले की, प्रोझोन मॉलमधील अनंतरा आणि दी स्ट्रेस हब स्पा मधील छाप्यात पोलिसांना अकरा पासपोर्ट आणि ९ थायलंडच्या मुली मिळाल्या. यातील ९ पैकी एका मुलीचे दोन पासपोर्ट मिळाले. यापैकी एक पासपोर्ट नकली असावा, अथवा रॅकेटमधील लोकांनी बनावट कागदपत्राच्या आधारे तिला दुसरा पासपोर्ट तयार करून दिला असावा, असा संशय आहे.
थायलंडचे नागरिक असलेल्या या मुलींना भारत सरकारने टुरिस्ट व्हिसा दिला आहे. असे असताना त्या येथे काम करीत असल्याचे आढळून आले. टुरिस्ट व्हिसावरील व्यक्तीला काम करता येत नाही, यामुळे त्यांनी व्हिसाच्या अटीचे उल्लंघन केले. या मुलींना बनावट पासपोर्टवर भारतात आणण्याचा आरोपींचा उद्देश अन्य काही आहे का, यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. देशविघातक कृत्यासाठी या मुलींचा वापर केला जात होता का, याविषयीही पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले. या गुन्ह्याचा तपास अत्यंत बारकाईने करण्यात येत असून, ‘स्पा’च्या दोन्ही मालकांना लवकरच अटक केली जाणार आहे. शिवाय प्रोझोन व्यवस्थापकांची चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
दुभाषकामार्फत नोंदविणार मुलींचा जबाबथाई भाषा पोलिसांना अवगत नसल्याने शहर पोलिसांनी दुभाषकांची मदत घेऊन त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या मुली सध्या महिला सुधारगृहात असल्याचे त्यांनी सांगितले. दोन पासपोर्ट कसे आणि का मिळविले, तसेच ज्या मुलीचा पासपोर्ट मिळाला, ती मुलगी सध्या कोठे आणि काय करीत आहे, या प्रश्नांची उत्तरे मुख्य आरोपींच्या अटकेनंतरच पोलिसांना मिळणार आहेत.
तपास गुन्हे शाखेकडे दिल्याने चर्चेला सुरुवातपोलीस उपायुक्तांनी गुन्हे शाखेला डावलून प्रोझोन मॉलमधील ‘स्पा’वर धाड मारली होती. लीस आयुक्तांनी मात्र,या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविल्याने उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.