रोजगार हमीच्या कामावर दोन हजार मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:14 AM2019-04-27T00:14:32+5:302019-04-27T00:15:06+5:30
फुलंब्री : १४९ कामे सुरू; तालुक्यात आणखी गावांमध्ये मागणी
फुलंब्री : तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची विविध प्रकारची १४९ कामे सुरू असून, या कामावर २ हजार मजूर काम करीत आहेत. सधा तालुक्यातील आणखी काही गावांतील नागरिकांनी हाताला काम मिळावे म्हणून मागणी केली आहे.
फुलंब्री तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सतत पावसाच्या प्रमाणात घट झाली आहे. यांचा परिणाम उत्पन्नावर झालेला दिसून येत आहे. यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. एकतर पिण्याच्या पाण्याची टंचाई त्यात पोट भरण्यासाठी रोजगार हमीच्या कामाकडे वळले आहेत.
फुलंब्री तालुक्यातील ५५ गावांमध्ये गाळ काढणे, रोपवाटिका तयार करणे, वैयक्तिक विहिरी, सार्वजनिक विहिरी, घरकुल बांधणे अशा प्रकारची एकूण १४९ कामे सुरू असून, या कामांवर १९३८ मजूर आजघडीला काम करीत आहेत.
बोधेगाव येथील मजूर मात्र प्रतीक्षेत
-तालुक्यातील बोधेगाव बु. येथील ग्रामपंचायतीकडे गावातील १७० मजुरांनी हाताला काम मिळावे म्हणून मागणी केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून संबंधित मजुराचे नमुना ४ चे अर्ज भरून ते तहसील कार्यालयात कामे मंजूर करण्याचे प्रस्ताव महिनाभरापासून दाखल करण्यात आलेले आहे. मात्र, अजूनही त्याची दखल घेतली नाही, अशी माहिती माजी सरपंच राजेंद्र वाघ यांनी दिली आहे.