‘दुरंगी ते तिरंगी’; पाच वर्षांत निर्माण झाला राष्ट्रध्वज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:02 AM2021-08-15T04:02:06+5:302021-08-15T04:02:06+5:30
स्वातंत्र्य सेनानी पिंग़ली व्यंकय्या मूळ ध्वजाचे निर्माते प्रभुदास पाटोळे औरंगाबाद : सुमारे ५ वर्षांपर्यंत ३० वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रध्वजांवरील संशोधनातून, ...
स्वातंत्र्य सेनानी पिंग़ली व्यंकय्या मूळ ध्वजाचे निर्माते
प्रभुदास पाटोळे
औरंगाबाद : सुमारे ५ वर्षांपर्यंत ३० वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रध्वजांवरील संशोधनातून, वेळोवेळी बदल होऊन, भारतीयांची आण, बाण आणि शान असलेल्या ‘तिरंगा’ राष्ट्रध्वजाची निर्मिती झाली. राष्ट्रध्वजाचा मूळ आराखडा (डिझाइन) आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणमजवळील भातलापेनुमारू येथील स्वातंत्र्यसेनानी पिंगली व्यंकय्या यांनी केली होती.
राष्ट्रध्वजाची रचना
काकीनाडा येथे आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान व्यंकय्या यांनी भारताचा स्वतःचा राष्ट्रध्वज असावा, असे सुचविले. गांधीजींना त्यांची कल्पना आवडली. गांधीजींनी त्यांना राष्ट्रध्वजाचा मसुदा तयार करण्याचे सुचविले होते. १९१६ ते १९२१ असे सुमारे ५ वर्षांपर्यंत ३० वेगवेगळ्या देशांच्या राष्ट्रध्वजावरील संशोधनातून व्यंकय्या यांनी तयार केलेला लाल आणि हिरवा पट्टा असलेला झेंडा १९२१ला विजयवाडा येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात दाखविला. यानंतरच देशातील काँग्रेस पक्षाच्या सर्व अधिवेशनांमध्ये दोन रंगांचा ध्वज वापरण्यात आला होता. परंतु त्यावेळी काँग्रेसने या ध्वजाला अधिकृतपणे मान्यता दिली नव्हती. प्रगती आणि सामान्य माणसाचे प्रतीक असलेल्या चाकाचा समावेश या ध्वजात करण्यात आला. त्यानंतर गांधीजींच्या सूचनेनुसार व्यंकय्या यांनी शांततेचे प्रतीक असलेला पांढरा रंग राष्ट्रध्वजामध्ये समाविष्ट केला. १९३१ मध्ये कराची येथील अखिल भारतीय परिषदेत भगवा, पांढरा आणि हिरवा या तीन रंगांनी बनलेला ध्वज काँग्रेसने एकमताने स्वीकारला. नंतर तिरंग्याच्या मध्यभागी फिरकीची जागा अशोकचक्राने घेतली.
असे झाले ध्वजामध्ये बदल
१. पहिला ध्वज ७ ऑगस्ट १९०६ रोजी कोलकात्यातील पारशी बागान (आताचा 'ग्रीन पार्क') येथे हिरवा, पिवळा आणि लाल या तीन रंगांचे पट्टे असलेला ध्वज फडकविण्यात आला होता. त्यातील हिरव्या पट्टीवर ८ पांढरी कमळाची फुले, पिवळ्या पट्टीवर गडद निळ्या रंगात 'वंदे मातरम' लिहिलेले आणि लाल पट्टीवर डावीकडील सूर्य आणि उजवीकडील चंद्रकोर पांढऱ्या रंगात बनवण्यात आली होती.
२. दुसरा ध्वज २२ ऑगस्ट १९०७ रोजी केवळ भारतातच नव्हे तर जर्मनीच्या स्टटगार्टमध्ये मॅडम कामा यांनी फडकवला होता. यामध्ये हिरव्या पट्ट्यावर ८ फुललेली कमळाची फुले, मधल्या पिवळ्या पट्टीवर 'वंदे मातरम' कोरलेले आणि सर्वांत खालच्या लालपट्टीवर डावीकडे सूर्य आणि उजवीकडे चंद्र होता.
३. तिसरा ध्वज डॉ. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी 'स्वराज्य चळवळी' दरम्यान फडकवला होता. यात ५ लाल आणि ४ हिरवे पट्टे , ७ तारे म्हणजे 'सप्तर्षी' डाव्या बाजूला ‘युनियन जॅक’ही कोरलेला होता.
४. चौथा ध्वज १९२१ मध्ये पांढरा, हिरवा आणि भगवा रंगाचा पट्टा आणि मध्यभागी निळा चरखा (कताईचे चाक) असलेला ध्वज गांधीजींनी विजयवाडा येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या बैठकीत स्वीकारला. हा ध्वज दहा वर्षे सर्वांसाठी वैध राहिला.
५. पाचवा ध्वज २२ जुलै १९४७ रोजी भारतीय काँग्रेस कमिटीच्या सात सदस्यांनी भगवा, पांढरा आणि हिरवा असे पट्टे आणि मध्यभागी निळे 'अशोक चक्र' असलेला ध्वज पंडित जवाहरलाल नेहरूंमार्फत संविधान सभेपुढे सादर केला. संविधान सभेने हा ध्वज स्वतंत्र भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला होता. तोच आजचा आपला तिरंगा राष्ट्रध्वज होय.