दोन वर्षांच्या मुदतीची इंजेक्शन्स तीन महिन्यांतच झाली सदोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:55 PM2018-11-26T22:55:17+5:302018-11-26T22:56:37+5:30
घाटी रुग्णालयास काही दिवसांपूर्वीच प्राप्त झालेल्या अॅसिडीटीवरील इंजेक्शनच्या साठ्यात बुरशीसदृश दोष आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे या इंजेक्शन्सचे तीन महिन्यांपूर्वीच उत्पादन झाले होते. दोन वर्षांच्या मुदतीची ही इंजेक्शन्स अवघ्या तीन महिन्यांतच सदोष झाली आहेत.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयास काही दिवसांपूर्वीच प्राप्त झालेल्या अॅसिडीटीवरील इंजेक्शनच्या साठ्यात बुरशीसदृश दोष आढळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे या इंजेक्शन्सचे तीन महिन्यांपूर्वीच उत्पादन झाले होते. दोन वर्षांच्या मुदतीची ही इंजेक्शन्स अवघ्या तीन महिन्यांतच सदोष झाली आहेत. त्यामुळे औषधी उत्पादन आणि पुरवठ्यातील बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला आहे.
घाटी रुग्णालयास २२ नोव्हेंबर रोजी रॅनिटिडीन नावाच्या ८० हजार इंजेक्शनचा पुरवठा झाला होता. हे इंजेक्शन घाटीतील वॉर्डांमध्ये पाठविण्यात आले; परंतु त्यातील इंजेक्शनच्या आरटी १८२४, १८२२, १८२३ आणि १८२६ या चार बॅचमध्ये बुरशीसदृश घाण कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास पडली. हा प्रकार ड्रग्ज स्टोअरच्या प्रमुखांना कळविण्यात आला. खबरदारी म्हणून तातडीने वॉर्डांमधून सर्व साठा काढून घेण्यात आला. चार बॅचमधील एकूण ६० हजार इंजेक्शनचा वापर थांबविण्यात आला आहे. या प्रकारानंतर अन्न व औषधी प्रशासनातर्फे या इंजेक्शनच्या नमुन्याची तपासणी केली जाणार आहे. प्रयोगशाळेतील तपासणी अहवालानंतरच इंजेक्शन्समध्ये नेमका काय दोष होता, हे समोर येणार आहे.
तपासणी यंत्रणाच नाही
राज्यभरात ‘हाफकिन’मार्फत औषधींचा पुरवठा होतो. उत्पादनापासून तर पुरवठ्यापर्यंत औषधींची पडताळणीच होत नसल्याचा प्रकार घाटीत आलेल्या सदोष इंजेक्शनमुळे समोर आला. शिवाय घाटीतही औषधी आल्यानंतर थेट वितरित केली जाते. औषधींची कोणत्याही प्रकारे तपासणी होत नाही. त्यामुळे दोषयुक्त इंजेक्शन थेट वॉर्डांपर्यंत गेली. वॉर्डातील कर्मचाºयांमुळे हा प्रकार लक्षात आला. अन्यथा सदोष इंजेक्शन रुग्णांना दिल्या जाण्याचा धोका होता.
इंदूर येथे उत्पादन
इंदूर येथील नंदिनी फार्मा यांनी जुलै २०१८ मध्ये या इंजेक्शनचे उत्पादन केले आहे. जून २०२० पर्यंत त्यांची मुदत होती. परंतु उत्पादनाच्या तीन महिन्यांत इंजेक्शन्समध्ये दोष आढळला.
अहवाल येईल
संबंधित चार बॅचच्या रॅनिटिडीनच्या ६० हजार इंजेक्शनचा वापर थांबविण्यात आला आहे. सदोष इंजेक्शन कोणत्याही रुग्णाला देण्यात आलेले नाही. अन्न व औषधी प्रशासनातर्फे तपासणीसाठी इंजेक्शनचे नमुने घेण्यात आले आहेत. अहवालानंतर नेमका काय दोष आहे, हे निश्चित होईल. ‘हाफकिन’नेदेखील संबंधित उत्पादकाला नोटीस बजावली आहे.
-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)