औरंगाबाद : नियमानुसार १०० टक्के अनुदान न देता २० टक्क्यांवर बोळवण केल्याच्या निषेधार्थ विनाअनुदानित शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर काळे फुगे आकाशात सोडून दिवाळी साजरी केली. यावेळी काळा आकाशकंदिल लावण्यात आला होता. निवेदनही काळ्या कागदावरच देण्यात आले. या अभिनव आंदोलनाला शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये मागील १८ वर्षांपासून विनावेतन अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्य सरकार न्याय देत नाही. सातत्याने अनुदानाचे आश्वासन देण्यात येते. शाळा १०० टक्के अनुदानास पात्र असतानाही केवळ २० टक्केच अनुदान दिले. यात दरवर्षी नैसर्गिक वाढ करणे गरजेचे असताना शासनाने त्यात काहीच वाढ केली नाही. या मागण्या मान्य करण्यासाठी आतापर्यंत १५० पेक्षा अधिक आंदोलने केली, तरीही आश्वासनांशिवाय पदारात काहीच पडले नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिक्षकांनी काळे आकाशकंदिल लावले. काळ्या रंगाच्या फुग्यांना काळ्या रंगाचेच निवेदन बांधून आकाशात सोडण्यात आले. इतर शिक्षकांसारखी आम्हालाही दिवाळी साजरी करण्यासाठी हक्काच्या मागण्या मान्य करण्याची विनंतीही निवेदनाद्वारे शासनाला केली. या आंदोलनात शिक्षक क्रांती सेनेचे प्रा. मनोज पाटील, विनाअनुदानित कृती समितीचे वाल्मीक सुरासे, रवींद्र तम्मेवार, सुरेखा शिंदे, आदिनाथ आडसरे, संभाजी काळे, नीलेश कोल्हे, शिक्षक सेनेचे नामदेव सोनवणे, दत्ता पवार, स्वप्नील शेळके, शिक्षण संस्था महामंडळाचे एस.पी. जवळकर, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे युनूस पटेल आदी उपस्थित होते.
या आहेत मागण्या :- सप्टेंबर २०१६ पासून २० टक्के अनुदान दिले. आता प्रत्यक्षात शाळा १०० टक्के अनुदानास पात्र आहेत. त्यामुळे १०० टक्के अनुदान द्यावे.- नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे नियमानुसार शाळांना निधी द्यावा.-अघोषित शाळांना निधीची घोषणा करावी. त्यानंतर त्या शाळेवरील शिक्षकांना वेतन द्यावे.