औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत अभूतपूर्व गदारोळ उडाला. इतिहासात पहिल्यांदाच सभागृहात पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि ठिय्या आंदोलन करणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकांची उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर काढत २० सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव संमत झाला. या सर्व गदारोळाचे कारण होते नवनिर्वाचित खा.इम्तियाज जलील यांच्या अभिनंदन ठरावाला सत्ताधारी शिवसेना-भाजपने दिलेली बगल.
गदारोळामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या आदेशाने व उपमहापौर, सभागृह नेत्यांच्या सूचक, अनुमोदनाने सदस्यत्व निलंबनाचा ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झत्तला. गुरुवारच्या मनपा सर्वसाधारण सभेत युती आणि एमआयएमचे नगरसेवक आमने-सामने आल्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सभागृहात साडेतीन तास ठिय्या देऊन महापौरांविरोधात घोषणा देणाऱ्या ६ ठिय्येकरी नगरसेवकांची पोलिसांनी उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर नेले. यामध्ये एमआयएमच्या विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनादेखील पोलिसांनी सभागृहाबाहेर काढले. पालिका सभेच्या कामकाजात पहिल्यांदाच २० नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव पारित करण्यात आला असून, पोलिसांनी सभागृहातून नगरसेवकांची उचलबांगडी करण्याची घटनाही पहिल्यांदाच घडली.
दोन दिवसांपूर्वी खा. जलील यांना सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात सत्ताधाऱ्यांनी डावलले होते. तेव्हा एमआयएम नगरसेवकांनी महापौर, प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले. त्याचे पडसाद गुरुवारच्या सभेत उमटले. सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी खा. जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. तुम्ही येण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील सर्व खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव घेतल्याचे सांगत बोर्डे यांची मागणी महापौरांनी फेटाळली. भाजप नगरसेवकांनी शहरातील पाणीटंचाईवर चर्चेची मागणी केली. महापौरांचे दुर्लक्ष व अवमानाच्या भावनेतून एमआयएम नगरसेवक अभिनंदन ठरावासाठी आक्रमक झाले, तर भाजप नगरसेवकांनीही पाण्यासाठी आवाज मोठा केला. भाजप आणि एमआयएम, असा संघर्ष होऊन सभेत वादाची ठिणगी पडली. पाण्यासाठी भाजपचे राजू शिंदे, प्रमोद राठोड यांनी राजदंड पळविला. मात्र, महापौरांच्या सूचनेवरून तो पुन्हा जागेवर ठेवला. भाजप नगरसेवकांनी पाण्यासाठी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या दिला, तर एमआयएम नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर अभिनंदन ठरावासाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्र्यंबक तुपे, विकास जैन, राजू वैद्य आदी महापौरांच्या बचावासाठी घोषणायुद्धात उतरले. हताश होऊन महापौरांनी सभेचे कामकाज थांबविले.
त्यानंतर लगेचच सभा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एमआयएम नगरसेवकांनी अभिनंदन ठरावासाठी घोषणेचा आवाज चढविला. त्यामुळे ठिय्या देणाऱ्या सहा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करीत त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचा आदेश महापौरांनी दिल्याने एमआयएमचे सर्व नगरसेवक आक्रमक झाले. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. महापौरांनी पुन्हा सभा तहकूब केली. ‘महापौरांचे करायचे काय, महापौर हाय... हाय...’ अशा घोषणा देत एमआयएम नगरसेवकांनी मनपा दणाणून सोडली. प्रत्युत्तरात शिवसेना-भाजप नगरसेवकांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘महापौर जिंदाबाद’, अशा घोषणा सुरूच होत्या.
पोलिसांना पहिल्यांदाच सभागृहात पाचारण घोषणायुद्ध थांबत नसल्याने प्रशासनाने सिटीचौक पोलिसांना पाचारण केले. पालिकेच्या सभागृहात येऊन पोलिसांनी एमआयएम नगरसेवकांना सभागृहातून बाहेर जाण्याचे आवाहन करण्याची घटना पहिल्यांदाच घडली. लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू आहे, कारवाईचे परिणाम वाईट होतील, असा इशारा विरोधी पक्षनेत्या बोर्डे, नगरसेवकांनी पोलिसांना दिला.४ या पेचामुळे पोलिसांनी प्रशासनाकडून कारवाईसाठी लेखी पत्राची मागणी केली. नगरसचिवांनी कारवाईसाठी पोलिसांना लेखी पत्र दिल्यानंतर पोलीस बळाचा वापर करीत नगरसेवकांची उचलबांगडी करून त्यांना सभागृहाबाहेर काढले. महिला नगरसेविका स्वत: होऊन बाहेर पडल्या. हे सगळे काही पहिल्यांदाच घडले.
महापौरांनी मतदारांचा अवमान केला नूतन खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव न घेता महापौरांनी जातीयवाद करीत खा. जलील यांना मतदान करणाऱ्या मतदारांचा अवमान केला आहे. लोकशाही मार्गाने सभागृहात आंदोलन केले. मात्र, विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यात आला. यापुढे महापौरांची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांनी महापौरांना दिले, तसेच सभेत काही महत्त्वपूर्ण आर्थिक विषय होते. शहरातील रस्त्यांची कामे निकृष्ट पद्धतीने सुरू असून, यावर आम्ही सभागृहात जाब विचारणार होतो; परंतु महापौरांनी मनमानी करीत आम्हाला सभागृहाबाहेर काढल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी केला.
एमआयएमने केले राजकारण एमआयएमने सर्वसाधारण सभेत गदारोळ करून शहराची प्रतिमा मलिन केली. क्षुल्लक कारणाचे एमआयएमने राजकारण केले. देशातील सर्व खासदारांचे अभिनंदन केले. मात्र, एमआयएमने पाणी प्रश्नावर चर्चा सुरू असताना वाद घातला. असंसदीय बोलून सभागृहात गदारोळ करणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिला.