कन्नड : रक्षाबंधनाच्या सणासाठी आलेल्या बहिणीच्या नशिबी भावाची अंत्ययात्रा आली. ही दुर्देवी घटना तालुक्यातील जेहुर येथे मंगळवारी सकाळी घडली. मंगेश राजेंद्र रिंढे (२३) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत देवगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
रक्षाबंधन सण हा बहिण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण आहे. बहिण भावाला राखी बांधुन दिर्घायुष्य चिंतीते तर बहिणीच्या रक्षणाच्या जबाबदारीची भावाला जाणीव करुन देणारा हा सण. या सणासाठी विवाहित बहिण दोन दिवसांपुर्वीच माहेरी आली होती. मंगेश राजेंद्र रिंढे (२३) व त्यांची आई गेल्या कित्येक वर्षांपासून जेहुर शिवारातील शेतजमीन (गट क्रमांक ८६) मध्ये शेतातील घरात राहत होते. दोन दिवसापूर्वी रक्षाबंधनाच्या सणासाठी बहिण आली असल्याने रात्री उशीरापर्यंत गप्पा गोष्टी झाल्या. यानंतर मंगेश दररोजच्या प्रमाणे घरालगतच्या कांद्याच्या चाळीत झोपायला गेला.
हेही वाचा - राजकीय आरोपांत रस्त्यांचा धुराळा; जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे ठप्प
सकाळी बहिण उठली आणि ती आपल्या चुलत्याकडे भेटण्यासाठी गेली. बराच उशीर झाला म्हणून आई लेकीला बोलवायला गेली. तेथून परत येताना कांद्याच्या चाळीत मंगेशने स्वत:ला दोरीने लटकून घेतल्याचे बघितले. हे दृष्य पाहून आईने आणि बहिणीने हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी मंगेशला खाली काढले पण तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. मंगेशच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करीत आहेत.