पालिकेचा मलेरिया विभागच ‘आजारी’!
By Admin | Published: February 22, 2016 12:16 AM2016-02-22T00:16:12+5:302016-02-22T00:16:12+5:30
सोमनाथ खताळ , बीड पालिकेतील मलेरिया विभाग सध्या समस्यांच्या गर्तेत आहे. औषधांचा तुटवडा, अपुरे कर्मचारी या समस्येत अडकलेल्या मलेरिया विभागाला साहित्याचाही वानवा असल्याचे दिसून येते
सोमनाथ खताळ , बीड
पालिकेतील मलेरिया विभाग सध्या समस्यांच्या गर्तेत आहे. औषधांचा तुटवडा, अपुरे कर्मचारी या समस्येत अडकलेल्या मलेरिया विभागाला साहित्याचाही वानवा असल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरात साथरोगांनी थैमान मांडले आहे.
मलेरिया विभागास एकूण ११६ पदे मंजूर आहेत; परंतु त्यापैकी केवळ ६७ कर्मचारीच कार्यरत आहेत. ३ पर्यवेक्षक, ३ कीटक समारक अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. एवढेच नाही मुख्य असणारे जीवशास्त्रज्ञ वर्ग-२ चे पद चार वर्षांपासून भरलेच नसल्याचे समोर आले आहे. तसेच ८ धूर फवारणी मशिनींपैकी केवळ तीनच सुरू आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाकडून वेळेवर औषधांचा पुरवठा होत नसल्याने पालिकेच्या मलेरिया विभागाला अनंत अडचणींना तोंड देत रोषाला बळी पडावे लागते.
मागील १५ दिवसांत १०,३३४ घरांना भेटी देत ३३ हजार २३० पाणी साठ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३४७ पाणी साठे दूषित आढळले आहेत. यामध्ये अबेटिंग, धूर फवारणी, औषध टाकणे आदी उपाययोजना करण्यात आल्या.
महिनाभर पुरेल एवढाच औषधीसाठा शिल्लक आहे. अबेटिंगसाठी लागणारे पायराथ्रेम हे औषध केवळ महिनाभर पुरेल एवढेच शिल्लक आहे. दोन महिन्यांपूर्वी औषधींचा तुटवडा जाणवला होता. पालिकेने स्वखर्चाने औषधी खरेदी केली होती.
...तर जबाबदार कोण?
साथरोगांचे थैमान असताना पालिकेकडून साधी धूळ फवारणी सुध्दा झालेली नाही. डेंग्यू, मलेरियाने यापूर्वी एका मुलीचा बळी गेला होता. याची पुनरावृत्ती झाल्यास जबाबदार कोणाला धरावे ? असा सवाल अरिंहंत नेहरु युवाचे ललित आब्बड यांनी रविवारी केली. साफसफाईकडे दुर्लक्ष असल्याचेही ते म्हणाले.