'गिरनेर तांडा'; औरंगाबादपासूनजवळ निसर्गाची मुक्त उधळण
By सुमेध उघडे | Published: July 28, 2021 07:24 PM2021-07-28T19:24:19+5:302021-07-28T19:25:12+5:30
Unseen Aurangabad : शहरापासून ७ ते ८ किलो मीटरच्या अंतरावर असलेल्या गिरनेर तांडा येथे हा नजारा पर्यटकांची वाट पाहत आहे.
पावसाचे धमाकेदार आगमन झाल्यानंतर पर्यटनस्थळांनी आपले रुपडे बदले आहे. हिरवेगार झालेले डोंगर आणि कोसळणारे धबधबे साऱ्यांना खुणावत आहेत. विशेष म्हणजे, औरंगाबादकरांना हे आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी कुठे दूर जाण्याचीही गरज नाही. होय, शहरापासून ७ ते ८ किलो मीटरच्या अंतरावर असलेल्या गिरनेर तांडा येथे हा नजारा पर्यटकांची वाट पाहत आहे. पैठण रोडवरील गेवराई तांडा येथून अवघ्या ४ किलो मीटरवर डोंगरात गिरनेर तांडा आहे. नेहमीच्या पर्यटनस्थळासारखी इथे गर्दी नसल्याने मन हरवून जाते. येथील हिरवाईने नटलेल्या डोंगरावरून कोसळणारे धबधबे पाहून मिळणारा आनंद अवर्णीय ठरतो. मात्र, कोरोना नियमांचे पालन करूनच हा आनंद घ्या.
कसे जाल -
औरंगाबाद ते पैठण रोडवर ४ किलोमीटरवर गेवराई तांडा आहे. या तांड्यापासून आतमध्ये ४ किमी गेल्यास गिरनेर तांडा लागतो. विशेष म्हणजे शहरापासून थेट गिरनेर तांड्यापर्यंत रस्ता चांगला आहे. यामुळे अगदी मोपेडवर सुद्धा जाता येईल.
काय पहाल -
गिरनेर तांड्यावर गेल्यास एक छोटीसी वस्ती नजरेस पडेल. या वस्तीपासून काही अंतरावरच एक मारुती मंदिर आहे. मागे डोंगर रांगा असून एक तलावही आहे. डोंगरावरून कोसळणारे धबधबे खास आकर्षण ठरतात. चढाईस सोपे डोंगर, स्वच्छ हवा, नितळ पाण्याचे वाहते झरे हे येथील वैशिट्य. तसेच हा भाग नेहमीच्या पर्यटनस्थळांच्या यादीतील नाही. यामुळे येथे काही मोजकीच पर्यटक भेट देतात. शांत वातावरणात निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर येथे एकदा नक्की भेट द्या.
( फोटो : इंस्टाग्राम - पराग सरवदे )