उद्यमनगरीतील ग्रीनबेल्ट उजाड करून पार्किंगसाठी वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 06:18 PM2018-03-29T18:18:15+5:302018-03-29T18:30:05+5:30
औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाने परिसर हिरवागार करण्यात आला होता. देखभाल व विकसित करण्यासाठी ग्रीनबेल्ट दिले असले तरी सर्रास वृक्षतोड करून पार्किंगसाठी त्या जागा उपयोगात आणल्या जात आहेत.
वाळूज महानगर ( औरंगाबाद ) : औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाने परिसर हिरवागार करण्यात आला होता. देखभाल व विकसित करण्यासाठी ग्रीनबेल्ट दिले असले तरी सर्रास वृक्षतोड करून पार्किंगसाठी त्या जागा उपयोगात आणल्या जात आहेत. त्यामुळे एमआयडीसीने मूळ उद्देशापासून लक्ष विचलित केले काय, असा प्रश्न निसर्गप्रेमींना पडला आहे.
झाडांना तारेचे संरक्षक कुंपण लावून सुरक्षारक्षकदेखील तैनात असताना औद्योगिक क्षेत्रातील रस्ते उजाड होत आहेत. ग्रीनबेल्टमध्ये अनेकांनी किरकोळ स्वरूपाचे व्यवसाय मांडले, तर अनेकांनी त्याचा आपापल्या सोयीनुसार उपयोग घेणे सुरू केले आहे. या प्रकाराकडे एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. तिरंगा चौकापासून ते बजाजनगर, साजापूर, रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, कमळापूर, इटावा, घाणेगाव इत्यादी परिसरातील विविध सेक्टरमधील झाडांची संख्या अधिक असल्याने पर्यावरणातील संतुलन राखणे सोयीचे ठरत होते; परंतु औद्योगिक क्षेत्रातील झाडावर ‘कु-हाड’ चालवून परिसर भकास केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तारेचे कुंपण तोडून त्या ठिकाणी अघोषित पार्किंग तयार करण्यात आलेली आहे.
एमआयडीसी परिसरातून अधिकारी, कर्मचारी सर्रास फेरफटका मारतात; परंतु झाडांची कत्तल त्यांच्या दृष्टीस पटत नसल्याचे दिसते. एमआयडीसीने बहुतांश कारखान्यांना त्यांच्या समोरील ग्रीनबेल्टचा परिसर विकसित करण्यासाठी व देखभालीसाठी दिलेला आहे. बहुतांश कंपन्यानी ग्रीनबेल्ट कायम ठेवण्यापेक्षा त्याचा वाहन पार्किंगसाठीच वापर केला आहे. मूळ उद्देशापासून लक्ष विचलित करण्याचा प्रकार या परिसरात पाहण्यास मिळत आहे.
‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा प्रचार शासनस्तरावर होत आहे, ही घोषणा कागदोपत्रीच राहते की काय, असा सवाल केला जात आहे. तिरंगा चौक ते साजारपूरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झाडांची संख्याच घटली आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे दीपक पाडळकर म्हणाले. ग्रीनबेल्ट ज्या उद्देशाने कारखानदाराला विकसित करण्यासाठी दिलेले आहेत त्यांनी दुर्लक्ष केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विठ्ठल कांबळे यांनी केली आहे.
चौकशी करून कारवाई करणार
औद्योगिक क्षेत्रातील झाडांची कटाई होऊ नये, तसेच ज्या कारखान्याला परिसर विकसित करण्यासाठी दिलेला आहे त्यांनी लक्ष दिले नाही आणि त्या ग्रीनबेल्टचा दुरुपयोग होत असेल तर त्याची चौकशी करून कारवाईदेखील करण्यात येईल, असे सहायक अभियंता डी.एस. परळीकर म्हणाले.