औरंगाबाद : जगभरासाठी महामारी ठरलेल्या कोरोनाविरुद्धच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाला शनिवारी (दि. १६) प्रारंभ झाला. लसीकरणाच्या या पहिल्याच दिवशी अनेकांनी लस घेतली; परंतु लस घेतलेल्या कोरोना याेद्धा कर्मचाऱ्यांना लसीकरणाला येण्याचे पुन्हा संदेश आल्याचा प्रकार मंगळवारी घाटीत समोर आला आहे. हा प्रकार जिल्हाभरात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घाटी रुग्णालयात ६० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे मंगळवारी नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांना लस घेण्यासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात संदेश पाठविण्यात आले होते. परंतु यात तिघांनी शनिवारीच लस घेतली होती. तरीही त्यांना संदेश आला. या संदर्भात त्यांनी घाटीतील लसीकरण केंद्राशी संपर्क साधून लसीकरण झाल्याचे सांगितले. नोडल ऑफिसर डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले, ॲपच्या मदतीने लसीकरणाची प्रक्रिया करण्यात आली. लसीकरण झालेल्या तिघांना पुन्हा संदेश गेले होते. त्यामुळे या तिघांना वगळून केवळ ५७ जणांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले.
शहरात शनिवारी रोजी को-विन ॲप डाऊनलोड होऊ शकले नव्हते. परिणामी केंद्रांवर ऑफलाईन म्हणजे कागदपत्रांवर नोंद करून लसीकरणाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. सोमवारी (दि. १८) लसीकरणाच्या दृष्टीने तयारी करण्यात आली. त्यासाठी कर्मचाऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली; परंतु ती अपलोड करताना लसीकरण झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे वेगळी करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यातूनच लसीकरण झालेल्या लोकांना पुन्हा लसीकरणाचे संदेश जाण्याचा प्रकार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, लसीकरण झालेल्यांना परत बोलविण्याचा प्रकार झाला नाही. ॲपमधील अडचणीमुळे अनेकांपर्यंत लसीकरणाचे संदेशच गेले नाहीत. फोन करून बोलवावे लागले.
एकीकडे ऑनलाईन, दुसरीकडे ऑफलाईन प्रक्रियाघाटीत मंगळवारी ऑनलाईन प्रक्रिया करण्यात आली; पण त्याच वेळी शहरातील खासगी रुग्णालयात ऑफलाईन प्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी ॲपकडे बोट दाखवून महापालिका अधिकारी मोकळे झाले.