‘वारी लालपरीची’तून उलगडला ‘एसटी’चा इतिहास अन् वर्तमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:12 PM2019-07-25T23:12:48+5:302019-07-25T23:14:45+5:30
एसटी महामंडळातर्फे गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानकावर आयोजित केलेल्या ‘वारी लालपरीची’ या प्रदर्शनाला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
औरंगाबाद : एसटी महामंडळातर्फे गुरुवारी मध्यवर्ती बसस्थानकावर आयोजित केलेल्या ‘वारी लालपरीची’ या प्रदर्शनाला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ‘एसटी’चा इतिहास, विविध रूपे आणि कालानुरूप झालेला बदल प्रवाशांसमोर उलगडला.
एसटी मंडळ आणि बस फॉर अस फाऊंडेशनतर्फे राज्यात २२ जुलैपासून ‘वारी लालपरीची’ हे फिरते प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. औरंगाबादेत प्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी उपजिल्हाधिकारी नीलेश श्रींगी, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया, यंत्र अभियंता (चालन) किशोर सोमवंशी, वरिष्ठ सुरक्षा दक्षता अधिकारी माणिकराव केंजळे, बद्रीप्रसाद मांटे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी अंबादास घोडके, साहेबराव कसबे, लक्ष्मीकांत गवारे, तेजराव बुद्धेवार, योगेश गिते, ललित शहा, किशोर बत्तीसे आदींची उपस्थिती होती.
लाल साधी बस, लालपरी ते शिवशाही बसचे मॉडेल्स प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. ‘एसटी’मधील अंतर्गत बांधणी, विविध मार्गांवरील त्यांचा प्रवास, एसटी महामंडळाकडून दिल्या जात असलेल्या सेवांची माहिती देण्यात आली आहे.
विशेषत: गेल्या पाच वर्षांत ‘एसटी’मध्ये झालेले बदल यातून दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली होती. २६ जुलै रोजी वेरूळ येथे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान नागरिकांना पाहता येणार आहे.