चंदीगडची विजयी घौडदौड, हिमाचल संघाला पराभवाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 01:11 AM2019-02-20T01:11:29+5:302019-02-20T01:11:53+5:30
साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चंदीगडने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली, तर हिमाचाल संघाला पराभव पत्करावा लागला. चंदीगडने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना आज हिमाचल संघावर ७-२ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह चंदीगड संघ अ गटात सहा गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे.
औरंगाबाद : साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात सुरू असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चंदीगडने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली, तर हिमाचाल संघाला पराभव पत्करावा लागला.
चंदीगडने सलग दुसऱ्या विजयाची नोंद करताना आज हिमाचल संघावर ७-२ असा दणदणीत विजय मिळवला. या विजयासह चंदीगड संघ अ गटात सहा गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. चंदीगडकडून हरप्रीतसिंगने ९ व्या व २५ मिनिटाला गोल केले. यशदीपने १९ व्या, अमनदीपने २८ व ५७ व्या मिनिटाला, सुखजितसिंगने ३८ व्या व सुखमनसिंग याने ४५ व्या मिनिटाला गोल केले. हिमाचलकडून वाशू देव आणि चरणजितने गोल केले.
क गटातील सामन्यात कर्नाटक व उत्तर प्रदेश या संघात २-२ अशी बरोबरी झाली. उत्तर प्रदेशकडून शारदा तिवारीने २६ व शिवम आनंदने ४० व्या मिनिटाला गोल केले, तर कर्नाटककडून अजित व्ही. एम.ने ३७ व सात्त्विक एच. आर.ने ५१ व्या मिनिटाला गोल केला. ब गटातील लढतीत मध्यप्रदेशने मुंबई संघावर ६-१ अशी मात केली. मध्य प्रदेशकडून विकास रजकने ४ थ्या व ४३ व्या असे दोन गोल केले. आलिशान याने १६ व्या व २० व्या मिनिटाला, तर प्रियोताबा तालेमने १० व्या व आदर्श हर्दुआ याने २३ व्या मिनिटाला गोल केले. मुंबईकडून मोहित कथोटेने ५३ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर एकमेव गोल केला. ड गटातील लढतीत हॉकी ओडिशा संघाने पंजाब अँड सिंध संघावर १-० अशी मात केली. कृष्णा तिर्की याने २३ व्या मिनिटाला ओडिशाकडून विजयी गोल केला. ड गटात झालेल्या सामन्यात बिहारने एसपीएसबीवर २-१ गोलने मात केली. विजयी संघाकडून सचिन डुंगडुंगने ३४ व संचित होरो याने ५१ व्या मिनिटाला गोल केला. एसपीएसबीकडून एकमेव गोल रजत मिन्झने २९ व्या मिनिटाला केला.
बुधवारचे सामने :
सकाळी ७ वा. हॉकी पंजाब वि. चंदीगड
स. ८.३० वा. : एसएससीबी वि. तामिळनाडू
स. १० वा. : हरियाणा वि. मध्यप्रदेश
११.३० वा. झारखंड वि. मणिपूर
दुपारी १ वा. गंगपूर ओडिशा वि. उत्तर प्रदेश
दु. २.३० वा. : महाराष्ट्र वि. दिल्ली
दुपारी ४ वा. भारतीय क्रीडा प्राधिकरण वि. बिहार