लाडसावंगी : गावातील प्रत्येक प्रमुख रस्ते चिखलमय झाल्याने गाव तसे चांगले हो, पण पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे वेशीला टांगले अशी म्हण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गावातील रस्त्यांवरून पायी चालणे देखील अवघड झाले असून सांडपाण्याचे नियोजन न केल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी हे गाव लोकसंख्येने सर्वाधिक मोठे आहे. येथील ग्रा. पं. सदस्य संख्या १८ आहे. एवढी मोठी सदस्यांची संख्या असून देखील गावातील रस्त्यांचे भाग्य काही उजाळत नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळा असो की उन्हाळा येथील प्रत्येक गल्लीत सांडपाण्याचे डपके साचलेले आहे. परिणामी चिखलमय रस्त्यामुळे नागरिकांना कायमच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
-----
गोठ्या उभारून शाळेला घातला वेढा
लाडसावंगीच्या जि. प. माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूलमध्ये जवळपास एक हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्याच शाळेसमोर गावातील सांडपाण्याचे डपके साचले असून त्यातून दुर्गंधी पसरली आहे. सिरजगाव रस्त्यावर विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना ये जा करताना गुडघाभर गटारीच्या पाण्यातून पायपीट करावी लागत आहे. तर काही नागरिकांनी शाळेच्या भिंती लगत शेळ्यांसाठी गोठे बांधून अतिक्रमण केले आहे.
-----
कोटीचा निधी मिळतो, तरी वाईट परिस्थिती
वार्ड क्रमांक चार व पाच मध्ये प्रत्येकी तीन व वॉर्ड क्रमांक सहा मध्ये दोन असे एकूण आठ सदस्य आहेत. या सदस्यांच्या वॉर्डातील रस्त्यांची दुरावस्ता झाली असून हे सदस्य डोळेझाक करीत आहेत. शासकीय निधी, बाजार लिलाव आदीतून दरवर्षी जवळपास एक कोटींचा निधी मिळतो. तरी देखील येथील रस्त्यांची समस्या व सांडपाण्याचे नियोजन होत नाही.
--------
गावकरी धरणार धारेवर
लाडसावंगी ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपायला वर्षभराचा कार्यकाळ शिल्लक राहिला आहे. इच्छुकांनी बाशिंग बांधून रेडी झाले असून पुढचा सरपंच मीच होणार, अशी स्पर्धा जणू लागली आहे. पण रस्त्याच्या मुद्द्यावरून गावकरी मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधीला चांगलेच धारेवर धरणार आहेत.
120921\img_20210912_123831.jpg
लाडसावंगी येथीला जि.प.हायस्कुल जवळील सिरजगाव चा रस्ता बारा ही महीने असा चिखलात रहातो.