औरंगाबाद : मराठवाडा वैधानिक मंडळ मराठवाड्याचा वैद्यकीय शिक्षणातील बॅकलॉग कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असून, मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालये अद्ययावत बनविण्यासाठी मंडळ कामाला लागले आहे. याबरोबरच औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (घाटी) व्हिजन-२०३० डॉक्युमेंट बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी ५ एप्रिल रोजी घाटी रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांनी कॉलेज कौन्सिलच्या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. मोहन डोईबळे, डॉ. मंगला बोरकर, डॉ. विजय गायकवाड, डॉ. प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती. मराठवाड्यातील हे पहिले वैद्यकीय महाविद्यालय असून ते अद्ययावत व्हावे, मुंबई, पुण्याच्या तुलनेत येथेही आधुनिक सेवा-सुविधा मिळाव्यात व मराठवाड्यासह विदर्भ, खान्देश येथून येणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळावा, यासाठी रुग्णालयाचे पुढील २०३० पर्यंतचे नियोजन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
यावेळी डॉ. बेलखोडे म्हणाले, सुपरस्पेशालिटीच्या बाबतीत एकाही विषयाचा विभाग मराठवाड्यात नाही. नाशिक, अमरावतीला जे होऊ शकते ते मराठवाड्यात का नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मनोविकार असणाऱ्या रुग्णांना पुणे, नागपूरला जावे लागते. त्यामुळे मराठवाड्यात या विषयाचे आधुनिक रुग्णालय सुरू होण्यावरही त्यांनी भर दिला. मराठवाड्यात एकही फिजिओथेरपी कॉलेज नसल्याने त्याचीही मागणी मंडळातर्फे करण्यात आल्याचे डॉ. बेलखोडे यांनी सांगितले.
२७० जागांचा अनुशेषच्मराठवाड्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश क्षमतेबद्दल बोलताना डॉ. बेलखोडे म्हणाले, अजूनही २७० जागांचा अनुशेष आहे. ३७ लाखलोकसंख्येला एक महाविद्यालय असावे. असे असताना मराठवाड्यात सध्याच्या परिस्थितीत ५० लाखांमागे एक महाविद्यालय उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवेशक्षमता वाढविण्यास किंवा नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय काढण्यास मराठवाड्यात वाव आहे.
सहा महिन्यांत व्हिजन डॉक्युमेंटअधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती काम करणार आहे. डॉ. अशोक बेलखोडे व आरोग्य समितीचे सदस्य डॉ. जयंत बरीदे मार्गदर्शक म्हणून असतील. डॉ. विजय गायकवाड, डॉ. मोहन डोईबळे यांच्यासह चार सदस्य नेमण्यात येतील. सहा महिन्यांत व्हिजन डॉक्युमेंट तयार होईल, अशी आशा डॉ. बेलखोडे यांनी व्यक्त केली.