विठ्ठल चैतन्य ठायी ठायी

By Admin | Published: July 16, 2016 01:08 AM2016-07-16T01:08:02+5:302016-07-16T01:20:23+5:30

औरंगाबाद : हाती टाळ, मुखी ‘विठ्ठल विठ्ठल’ नामोच्चार करीत सहा लाख भाविक चोहोबाजूंनी छोट्या पंढरपूरच्या दिशेने जात होते. अनेक जण विठुरायाच्या दर्शनासाठी अनवाणी चालत होते...

Vitthal Chaitanya Thayei | विठ्ठल चैतन्य ठायी ठायी

विठ्ठल चैतन्य ठायी ठायी

googlenewsNext

औरंगाबाद : हाती टाळ, मुखी ‘विठ्ठल विठ्ठल’ नामोच्चार करीत सहा लाख भाविक चोहोबाजूंनी छोट्या पंढरपूरच्या दिशेने जात होते. अनेक जण विठुरायाच्या दर्शनासाठी अनवाणी चालत होते... ‘ भेटी लागे जिवा लागलीसे आस’ याचा तंतोतंत प्रत्यय प्रत्येकाला येत होता...तरुण असो वा वृद्ध; प्रत्येकामध्ये विठ्ठल चैतन्य ठायी ठायी संचारले होते... जेव्हा सर्व वैष्णव पांडुरंगांच्या चरणी लीन झाले, तेव्हा विठ्ठल भक्तीचे विराट दर्शन पाहण्यास मिळाले.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुखमाईचे दर्शन घेण्यासाठी औरंगाबाद शहराजवळील छोट्या पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा महापूर लोटला होता. शुक्रवारी पहाटेपासूनच भाविक आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत होते. कोणी गाडीतून, कोणी दिंडीद्वारे तर कोणी गटा-गटाने छोट्या पंढरपुरात पोहोचत होते. दिंड्यामागून दिंड्या येत होत्या. लाखो भाविक रस्त्याने शिस्तीने जात होते. भाविकांच्या शिस्त व भक्तीचे दर्शन यामुळे सर्वांना घडले. छोटे पंढरपूर लाखो भाविकांनी बहरून गेले होते. जिकडे तिकडे भाविकच भाविक दिसत होते.
औरंगपुरा, पदमपुरा, छावणी, बेगमपुरा, विष्णूनगर, कैलासनगर, जवाहर कॉलनी, सिडको-हडको, हर्सूल, मुकुंदवाडी, चिकलठाणाच नव्हे तर आसपासच्या तालुक्यांतूनही शेकडो दिंड्या छोट्या पंढरपूरच्या दिशेने चालल्या होत्या. एवढेच नव्हे तर जालना, जळगाव, श्रीरामपूर या भागांतूनही दिंड्या यंदा या पंढरपुरात दाखल झाल्या होत्या. पुरुषांच्या बरोबरीने महिलाही दिंडीत सहभागी झाल्या होत्या. मार्गावर जागोजागी फराळाची व विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली होती. छावणीच्या पुढे रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत काही दिंड्यांचे भारुड, गवळणीचे कार्यक्रम रंगले होते. ज्यांचे मोठ्या पंढरपुरात जाणे शक्य झाले नाही, असे भाविक छोट्या पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेत होते. या गावाला जत्रेचे स्वरूप आले होते. तासन्तास रांगेत उभे राहून जेव्हा विठ्ठलाचे दर्शन होई, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकत होती. पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी टिकून होती.

 

Web Title: Vitthal Chaitanya Thayei

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.