औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने वॉर्ड रचनेत प्रचंड घोळ केल्यानंतर आज मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्येही घोळ केल्याचे समोर येत आहे. एका वॉर्डातील मतदार उचलून सोयीच्या दुसऱ्या वॉर्डात टाकण्यात आल्याचे प्रकार समोर येत आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला ९ मार्च रोजी मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी दुपारी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. याद्या पाहण्यासाठी वॉर्ड कार्यालय, मनपा मुख्यालयात इच्छुकांनी गर्दी केली. मतदार याद्या बघितल्यानंतर उमेदवारांच्या पायाखालची वाळूच घसरली. वॉर्डातील अनेक मतदार दुसऱ्याच वॉर्डात टाकल्याचे समोर आले. वॉर्ड क्रमांक ५८ इंदिरानगर बायजीपुरा पश्चिम येथील लोकसंख्या १० हजार ६०० दर्शविण्यात आली. मतदारांची संख्या ५ हजार ८२५ करण्यात आली. या वॉर्डातील मतदार वॉर्ड क्र. ६० इंदिरानगर बायजीपुरा पूर्व, अल्तमश कॉलनी, वॉर्ड क्र. ५७ संजय तीन वॉर्डांमध्ये टाकण्यात आल्याचे समोर आले. मनपाने प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी तीन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.
वेबसाईटवर यादी नाहीमनपाने मतदार याद्या प्रकाशित केल्यानंतर निवडणूक विभाग मनपाच्या वेबसाईटवर याद्या टाकेल, असे जाहीर करण्यात आले होते. तांत्रिक कारणांमुळे याद्या वेबसाईटवर टाकण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले.