धर्मनिरपेक्ष उमेदवारालाच मतदार पसंती देतील, प्राध्यापकांनी व्यक्त केली सडेतोड भूमिका
By विजय सरवदे | Published: April 25, 2024 04:46 PM2024-04-25T16:46:20+5:302024-04-25T16:47:41+5:30
लोकसभा उमेदवार कसा असावा?
छत्रपती संभाजीनगर : विकासकामे तडीस लावणारा सक्षम नेता म्हणून नव्हे, तर जातीच्या संख्येवर उमेदवारी दिली जाते. हे राजकीय पक्षांचे धोरण चुकीचे आहे. सर्व जाती-धर्माची मते घेऊनच उमेदवार निवडून येतो, याचा विचार होत नाही, हे दुर्दैव. या निवडणुकीत महागाई, पाणी, उद्योग, पर्यटन, बेरोजगारी या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्याची धमक असणारा, सुशिक्षित, धर्मनिरपेक्ष उमेदवारालाच सामान्य मतदार पसंती दर्शवतील, असा विश्वास डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्राध्यापकांनी व्यक्त केला. ‘लोकमत’ने महाविद्यालयामध्ये जाऊन निवडणुकीच्या मुद्यांवर प्राध्यापकांच्या भावना जाणून घेतल्या.
प्राध्यापक हे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राचे अभ्यासक असतात. या क्षेत्रांकडे त्यांची बघण्याची दृष्टी तटस्थपणाची असते. त्यामुळे लोकसभेच्या होऊ घातलेल्या या निवडणुकीत उमेदवार कसा असावा, त्याच्याकडून सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा आहेत, यावर अनेकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याप्रसंगी प्रा. सी.बी. परदेशी व प्रा. ए.एम. वेंकेश्वर या दोन महिला प्राध्यापकांनी एकाही पक्षाने महिला उमेदवार द्यावा, याचा विचार केलेला नाही, अशी खंत व्यक्त केली.
राजकारणाचा चिखल झालाय
पक्षाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून यापूर्वी निवडून गेलेेले किंवा आता रिंगणात असलेल्या उमेदवारांना सामान्य मतदारांनी मतदान केले होते, आताही करतील. मात्र, अलीकडच्या काळात राजकारणाचा चिखल झाला आहे. स्वार्थापोटी वेगळ्या विचारांच्या पक्षासोबत अभद्र युती केली जातेय. त्यामुळे राजकीय पक्षांनी विश्वासार्हता गमावलेली असून मतदार संभ्रमात आहेत. चारित्र्य संपन्न व जिल्ह्याच्या प्रश्नाला न्याय देऊ शकणाऱ्या उमेदवाराला लोक निवडून देतील.
- उपप्राचार्य प्रा. एन.एम. करडे
विचाराची जाण असावी
शेतकऱ्यांची मते घेतात आणि नंतर त्यांच्याच प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. पंधरा वर्षांपूर्वी असलेला शेतीमालाचा भाव आजही तोच आहे. निवडून गेल्यानंतर त्या उमेदवाराने ग्रामीण भागाच्या संपर्कात असले पाहिजे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणारा उमेदवार असावा, सध्या तसा उमेदवार दिसत नाही.
- प्रा. आर.बी. घोडे
पर्यटन विकासासाठी प्रयत्न व्हावेत
बेरोजगारी, महागाई, पाण्याबरोबर जिल्ह्यात अजूनही अनेक प्रश्न आहेत. आपला जिल्हा हा पर्यटनाची राजधानी आहे. मात्र, आतापर्यंत निवडून गेलेल्या खासदारांनी पर्यटन विकासासाठी फारसे प्रयत्न केलेले नाहीत. पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला, तर येथील लहान-मोठे व्यावसायिक, हॉटेल्स चालतील व टिकतील. त्यामुळे काही प्रमाणात रोजगाराचा प्रश्नही सुटेल.
- डॉ. नवनाथ गोरे
धर्माचा नव्हे, मतदारसंघाचा प्रतिनिधी असावा
संकुचित प्रवृत्तीचा उमेदवार जनता नाकारते. अलीकडे धर्माच्या नावावर मते मागण्याचे फॅड आले आहे. तो कोण्या एका धर्माची किंवा जातीची मते घेऊन निवडून जात नाही. तो मतदारसंघातील सर्वसमावेशक मते घेतल्यानंतरच निवडून जातो. त्यामुळे निवडून गेलेल्या उमेदवाराने संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करावे.
- डॉ. आर.व्ही. मस्के
शैक्षणिक धोरणावर बोलणारा उमेदवार असावा
नवीन शैक्षणिक धोरणामुळे गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढत जाणार आहे. सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण केले जात आहे. यामुळे आरक्षण असूनही त्याचा उपयोग नाही. बेरोजगारी वाढत चालली आहे. त्यामुळे पक्षाचा मुलाहिजा न बाळगता संसदेत हे मुद्दे पटवून देणारा उमेदवार असावा.
- प्रा. ए.पी. बारगजे
सामान्य मतदार संभ्रमात
सध्याचे राजकीय चित्र बघितले, तर सामान्य मतदारांचा कोणत्याही राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाही. तो संभ्रमात आहे. विचार आणि कर्तबगार पक्ष म्हणून मतदान केले, तर उद्या तो उमेदवार त्या पक्षात राहीलच, असे वाटत नाही.
- डॉ. सुरेश चौथाइवाले
निष्कलंक उमेदवार दिसत नाहीत
राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना तो निष्कलंक आहे का, याचा विचार केला पाहिजे. सध्या देशात व राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षांना उमेदवार सापडत नाही, हे दुर्दैव नव्हे का? रिंगणात असलेले उमेदवार हे पक्षांनी लादलेले आहेत.
- प्रा. एस.पी. खिल्लारे