सीटी स्कॅनसाठी ‘वेटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:27 PM2019-01-21T23:27:10+5:302019-01-21T23:27:48+5:30

घाटी रुग्णालयातील ६४ स्लाईस सीटी स्कॅनला नादुरुस्तीमुळे कायमस्वरूपी टाळे लागले आहे. सध्या एक च यंत्र सुरू असल्याने पूर्वीच्या तुलनेत आजघडीला निम्म्या रुग्णांचीच तपासणी होत आहे. परिणामी, अनेक रुग्णांना तपासणीसाठी आठवडाभराची प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे. तब्बल दहा महिन्यांपासून नव्या यंत्राची नुसती वाट पाहावी लागत आहे.

'Waiting' for CT scan | सीटी स्कॅनसाठी ‘वेटिंग’

सीटी स्कॅनसाठी ‘वेटिंग’

googlenewsNext
ठळक मुद्देएकाच यंत्रावर भार : ६४ स्लाईस सीटी स्कॅनला कायमस्वरूपी टाळे, नव्या यंत्राची प्रतीक्षाच

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील ६४ स्लाईस सीटी स्कॅनला नादुरुस्तीमुळे कायमस्वरूपी टाळे लागले आहे. सध्या एक च यंत्र सुरू असल्याने पूर्वीच्या तुलनेत आजघडीला निम्म्या रुग्णांचीच तपासणी होत आहे. परिणामी, अनेक रुग्णांना तपासणीसाठी आठवडाभराची प्रतीक्षा करण्याची वेळ येत आहे. तब्बल दहा महिन्यांपासून नव्या यंत्राची नुसती वाट पाहावी लागत आहे.
घाटी रुग्णालयात गेली अनेक वर्षे ६४ स्लाईस आणि ६ स्लाईस अशा दोन सीटी स्कॅन यंत्राद्वारे रुग्णसेवा दिली जात होती. यातील ६४ स्लाईस यंत्राला दहा वर्षांचा कालावधी उलटून गेला. परिणामी, हे मशीन वारंवार नादुरुस्त होत होते. सहा महिन्यांपूर्वी यंत्रात बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त न करण्याचा निर्णय घाटी प्रशासनाने घेतला. त्यामुळे या यंत्राला कायमस्वरूपी टाळे लागले.
घाटी रुग्णालयाला नवीन सीटी स्कॅन यंत्र मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न क रण्यात आले. अखेर त्यास यश मिळाले. २०१७-१८ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर ७ कोटी रुपयांच्या अनुदानातून १२८ स्लाईस सीटी स्कॅन खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली. विविध प्रक्रियांच्या अडथळ्यात हे यंत्र अद्यापही प्राप्त झालेले नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून ६ स्लाईस यंत्रावरच रुग्णांचा भार आहे. क्ष-किरण विभागप्रमुख डॉ. वर्षा रोटे म्हणाल्या, १२८ स्लाईस यंत्राची निविदा प्रक्रिया झालेली आहे. सिमेन्स कंपनीकडून लवकरच अत्याधुनिक असे यंत्र प्राप्त होणार आहे. या यंत्रामुळे सगळ्या प्रकारच्या तपासण्या होतील.
रुग्णसंख्या १२० वरून ६०
६ स्लाईस यंत्राने पूर्वी सुमारे १२० रुग्णांची तपासणी केली जात असे; परंतु ६४ स्लाईस यंत्र बंद पडल्यानंतर आता सध्या कार्यरत यंत्र नादुरुस्त होऊ नये, यासाठी रुग्णसंख्या निम्मी करण्यात आली. दररोज केवळ ५० ते ६० रुग्णांची तपासणी होत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना आर्थिक फटका सहन करून बाहेरून सीटी स्कॅन करून घ्यावे लागते. अत्यावश्यक रुग्णांचे तात्काळ सिटी स्कॅन होत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

Web Title: 'Waiting' for CT scan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.